अमरावती विद्यापीठातील समस्या लवकरच सोडविणार
By admin | Published: July 24, 2015 11:46 PM2015-07-24T23:46:40+5:302015-07-24T23:46:40+5:30
ना.विनोद तावडे यांनी अकोला दौ-यात दिले आश्वासन.
अकोला - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विविध समस्या सुटणार असून, विद्यापीठाच्या समस्यांवर गुरूवारी विधिमंडळात बैठक पार पडली. गृहराज्यमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीत विद्यापीठाच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांनी दिले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये विविध समस्या प्रलंबित आहेत. या गंभीर समस्यावर आज विधिमंडळात शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांच्या कक्षात बैठक पार पडली. यावेळी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर उपस्थित होते. विद्यापीठामध्ये तीन इमारती प्रस्तापित तसेच निमार्णाधिन आहेत. त्यामध्ये मुल्यांकन इमारत २.५६ कोटी, मुलींचे वसतिगृह १२ लाख आणि ६१ लाखाच्या डॉ.श्रीकांत जिचकार स्मृति सेंटरचा समावेश आहे. यासर्व इमारतींच्या निधीवर चर्चा करण्यात आली. इमारतीच्या निधीचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले. बुलडाणा जिल्ह्यातील मॉडेल डिग्री कॉलेजच्या वेतन आणि खर्चावर २६ लाखाचा निधी खर्च झाला असून, तो प्रलंबित असल्याच्या मुद्द्यावरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या महाविद्यालयातील रिक्त पदांवरही चर्चा करण्यात आली. त्यामध्ये रिक्त पदे भरण्याला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे ही शिक्षणमंत्र्यांनी सांगिलते. याशिवाय थकीत वेतनासह विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या सर्व समस्यांबाबत तातडीने माहिती घेवून ते सोडविण्याचे आश्वासन यावेळी उच्च व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले.