अमरावतीचा विजय भोयर ठरला ‘विदर्भ श्री-२०२०’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 02:20 PM2020-03-09T14:20:11+5:302020-03-09T14:20:44+5:30
शरीर सौष्ठव स्पर्धेत अमरावतीचा शरीर सौष्ठवपटू विजय भोयर ‘विदर्भ श्री २०२०’चा मानकरी ठरला आहे
अकोला : विदर्भ बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशनतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत अमरावतीचा शरीर सौष्ठवपटू विजय भोयर ‘विदर्भ श्री २०२०’चा मानकरी ठरला आहे. यावेळी भारत श्री २०१९ च्या मानकरी स्नेहा कोकणे पाटील यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरले.
विदर्भ बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम गावंडे यांनी शनिवार, ७ मार्च रोजी कौलखेडस्थित गजानन महाराज मंदिर परिसरात ‘विदर्भ श्री २०२०’ शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘युवक बलदंड तर देश बलदंड’, या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री गुलाबराव गावंडे, उद्घाटक एशियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सेक्रेटरी संजय मोरे, विशेष आकर्षण भारत श्री स्नेहा कोकणे पाटील, डॉ. संतोषकुमार कोरपे, माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, उपविभागीय अधिकारी सचिन कदम व श्रीकांत पिसे पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक संग्राम गावंडे यांनी केले. युवकांच्या बळावर हा देश महासत्ता होऊ शकतो, असे मत माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी व्यक्त केले. क्रीडा क्षेत्रामध्ये मुलींनी भरारी घ्यावी, असे आवाहन यावेळी स्नेहा कोकणे पाटील यांनी केले. याप्रसंगी तुकाराम बिडकर, गजानन दाळू गुरुजी यांनीही मनोगत व्यक्त केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विदर्भ बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम गावंडे, महासचिव अभिषेक कारिंगवार, नगरसेवक मंगेश काळे, माजी नगरसेवक पंकज गावंडे, टिपू शिंदे, विशाल गावंडे, शिवा मोहोड, अक्षय भालतिलक, अभिजित मुळे, करण दोड, शरद सरप, गजू पावसाळे, सुमित नागझरे, गौरव इंगळे व सागर चांभारे यांनी पुढाकार घेतला. स्पर्धेत विविध वजनगटात नागपूर येथील प्रकाश निमजे, रेहान कुरेशी, सुरेंद्र शाहू, तर अकोल्यातील शेख सलीम, सय्यद कुरम, सुयश जडिये विजेते ठरले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
हे आहेत स्पर्धेतील विजेते
विदर्भ श्री २०२० - विजय भोयर, अमरावती
बेस्ट पोझर - शुभम कडू पाटील अमरावती
बेस्ट इम्पू्रमेंट - सुरेंद्र शाहू, नागपूर.