..तर आयुक्तांची शासनाकडे तक्रार
By Admin | Published: June 1, 2015 02:32 AM2015-06-01T02:32:30+5:302015-06-01T02:32:30+5:30
मोबाइल टॉवर प्रकरण; विजय अग्रवाल यांचा इशारा.
अकोला: मनपाच्या परवानगीशिवाय उभारलेल्या २४ पैकी १७ मोबाइल टॉवरला दंड आकारून त्यांना नियमात बसविण्याचा प्रताप करणारे आयुक्त सोमनाथ शेटे यांनी याविषयी संपूर्ण माहिती सभागृहात सादर करावी, अन्यथा त्यांच्याविरुद्ध शासनाकडे तक्रार करणार असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी शनिवारी स्पष्ट केले. साहाय्यक नगर रचनाकार यांचा अभिप्राय न नोंदवता आयुक्तांनी थेट परवानगी दिल्याची बाब संशयास्पद असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला. मनपा क्षेत्रात फोर-जीसाठी ८९ किलोमीटर अंतराच्या केवळ खोदकामाची परवानगी रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीला देण्यात आली. १२ कोटी २३ लाख रुपयांत हा करार प्रशासनाने केला. या करारात मोबाइल टॉवर उभारणीचा कोणताही समावेश नव्हता. तत्कालीन आयुक्त दीपक चौधरी यांच्या कालावधीत खोदकामाच्या व्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी ८५ मोबाइल टॉवर उभारणीसाठी कंपनीने ६ कोटी रुपये जमा करण्याची तयारी दर्शवली होती. राज्य शासनाच्या नव्या निकषानुसार टॉवर उभारणीसाठी संबंधित कंपन्यांना इमारत किंवा जमीन मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, इमारतीच्या बांधकामाचा मंजूर नकाशा, स्ट्ररल ऑडिट रिपोर्ट, सोसायटी असल्यास नागरिकांचे नाहरकत प्रमाणपत्र, पर्यावरण विभागाची परवानगी तसेच शाळा-महाविद्यालयांचे अंतर आदी बाबी मनपाकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी मात्र कंपनीने प्रशासनाच्या डोळ्य़ात धूळफेक करीत कोणत्याही परवानीशिवाय २४ टॉवरची उभारणी केली. मनपाचे साहाय्यक नगर रचनाकार यांचा अभिप्राय डावलून आयुक्त सोमनाथ शेटे यांनी १७ मोबाइल टॉवरला दिलेली परवानगी संशयास्पद असल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी केला. कंपनीने सादर केलेले दस्तऐवज सभागृहात सादर करावे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सभागृहाला आहे. तसे न झाल्यास आयुक्तांची शासनाकडे रीतसर तक्रार करणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.