...अन् वैद्यकीय प्रतिनिधींनी उघड्यावरच जाळले औषधं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 06:42 PM2019-10-19T18:42:26+5:302019-10-19T18:42:52+5:30
जळालेल्या औषधांमधून विशारी वायु उत्सर्जीत झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.
अकोला : औषधांचे विघठन हे शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करणे आवश्यक आहे. मात्र, काही खासगी वैद्यकीय प्रतिनिधींकडून रहिवाशी परिसरात उघड्यावरच औषधं जाळल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री उशीरा कौलखेड भागातील गायत्रीनगर परिसरात घडला. जळालेल्या औषधांमधून विशारी वायु उत्सर्जीत झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे.
कौलखेड भागातील गायत्रीनगर परिसरात शुक्रवार १८ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास काही खासगी वैद्यकीय प्रतिनिधींनी उघड्यावरच औषधं जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जाळण्यात आलेली ही औषधं फ्युजन हेल्थ केअर लिमिटेड या खासगी कंपनीचे असून हे वैद्यकीय प्रतिनिधी देखील याच कंपनीचे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ज्या ठिकाणी ही औषधं जाळण्यात आली, तेथून जवळच शाळा असून परिसरातही दाट वस्ती आहे. जाळण्यात आलेल्या औषधांमधून विशारी वायुचे उत्सर्जन झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांनी घटनास्थळ गाठले. परिसरातील रहिवासी आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्यांनी या प्रकाराबद्दल संबंधीत वैद्यकीय प्रतिनिधींनी हटकले असता त्यांनी त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा केली. परिसरातील नागरिकांनी रात्री उशीरापर्यंत या प्रकाराला विरोध केल्यावरही संबंधीत वैद्यकीय प्रतिनिधींनी औषधं जाळण्याची प्रक्रिया थांबविली नाही.