..अन्यथा ग्रामसेवक, सरपंचाविरुद्ध तक्रार
By admin | Published: February 24, 2016 01:52 AM2016-02-24T01:52:01+5:302016-02-24T01:52:01+5:30
ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामावर मनपा आयुक्तांची बैठक.
अकोला: महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीत शहरानजीकच्या २१ गावांचा समावेश आहे. ग्रामपंचायत हद्दीत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत इमारती उभारल्या जात असून, सदर बांधकामे तातडीने न थांबवल्यास पोलीस तक्रारीचा मार्ग खुला असल्याचा स्पष्ट इशारा मंगळवारी आयोजित बैठकीत तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांना मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दिला. यावेळी काही ग्रामसेवकांनी अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याची तयारी दर्शवली. मनपाच्या हद्दवाढीच्या दिशेने शासनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. जून महिन्यापर्यंत हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण होणार असून, मनपा क्षेत्रात शहरानजीकच्या २१ गावांचा समावेश होईल. शासनाकडे विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल)चा प्रस्ताव विचाराधीन असून, निश्चितच चटई निर्देशांक (एफएसआय)मध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत ह्यडीसी रूलह्ण लागू होत नाही, तोपर्यंत इमारतींचे अवाजवी बांधकाम बंद करण्याचे आदेश आयुक्त अजय लहाने यांनी जारी केले आहेत. त्यानुसार शहरात व्यावसायिक तसेच रहिवासी इमारतींचे बांधकाम ठप्प पडून आहे. शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. हद्दवाढ होईल या विचारातून बांधकाम व्यावसायिकांनी सदनिका (फ्लॅट) विकण्याचा सपाटा लावला आहे. ही बाब आयुक्त लहाने यांच्या निदर्शनास आली. ग्रामपंचायत क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम तातडीने बंद करण्याच्या मुद्यावर मंगळवारी आयुक्तांनी तहसीलदार, नायब तहसीलदार, संबंधित ग्रामपंचायतचे तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांच्यासोबत बैठक आयोजित केली. आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत उपस्थितांना इमारतींचे बांधकाम बंद करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. सदनिका, दुकानांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पडले असतील तरीही संबंधित तलाठी, ग्रामसेवक, सरपंचासह कंत्राटदाराविरोधात पोलीस तक्रारीचा मार्ग खुला असल्याचे आयुक्त अजय लहाने यांनी यावेळी स्पष्ट केले.