आंदोलन... "बोगस जात प्रमाणपत्र काढणाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करा"
By रवी दामोदर | Published: August 23, 2023 07:43 PM2023-08-23T19:43:18+5:302023-08-23T19:45:06+5:30
बंजारा समाज बांधावांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
रवी दामोदर, अकोला
अकोला : विमुक्त जाती (अ) या संवर्गाामध्ये अनेक वेगवेगळ्या जातीचा समावेश करण्यात आला आहे. परंतू काही लोकांकडून जातीच्या साधर्म्यांचा गैरफायदा घेऊन बेकायदेशिरपणे जात प्रमाणपत्र मिळवून नोकरीमध्ये फायदा घेत आहे. त्यामुळे मुळ विमुक्त जाती (अ)च्या संवर्गातील मुलांना शिक्षणामध्ये व नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे अशा बोगस जात प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करीत जिल्ह्यातील बंजारा बांधवांनी बुधवार, दि. २३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
बंजारा बांधवांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानुसार, मंत्री अतूल सावे यांनी विमुक्त जाती (अ) मध्ये होणाऱ्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी व बोगस जात प्रमाणपत्र मिळवून शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करीता नेमली जाणाऱ्या विशेष चौकशी समिती रद्द केल्याबाबत विधान केल्यामुळे विमुक्त जाती (अ) या संवर्गातील लोकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे चौकशीसाठी समिती नियुक्ती करावी, यासह विविध मागण्या मागणी बंजारा बांधवांनी केली आहे. यावेळी लता आत्माराम राठोड, सुलक्षणा राठोड, सुजाता जाधव, शर्मीला पवार, आशा जाधव, सुरेखा चव्हाण, राणी चव्हाण, अर्चना राठोड, सागर चव्हाण, ज्योती राठोड, मनिषा राठोड, शितल जाधव, वर्षा पवार, छाया चव्हाण, संजना चव्हाण, सिमा जाधव, अर्चना जाधव, रंजना जाधव, यशपाल जाधव आदी उपस्थित होते.
ह्या आहेत प्रमुख मागण्या
विमुक्त जाती (अ) चे जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी रक्त नाते संबंधित २०१७ चा शासकीय निर्णय , अधिसूचना रद्द करावा. बोगस जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थींची व बोगस जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करावी. विमुक्त जाती प्रवर्गाला लागू असलेली नॉन क्रिमिलीअरची अट रद्द करावी.