रजतनगरीत घडला अनोखा तबला!
By admin | Published: July 25, 2015 01:16 AM2015-07-25T01:16:54+5:302015-07-25T01:16:54+5:30
खामगाव येथील कारगीराने जागतिक कीर्तीच्या कलावंतांसाठी घडविले तबले.
अनिल गवई / खामगाव : ख्यातनाम तबला वादक पंडित जाकीर हुसेन यांच्यासह अमेरिकेतील तबला वादक पं. काणे यांच्याकडून खामगावातील तबल्याला पंसती मिळाली आहे. येथील तबला सातासमुद्रापार पोहोचला अस तानाच, आता तबल्यावर शाई नसलेला तबला आणि डग्गा रजतनगरीत निर्माण झाला आहे. तबला दुरूस्तीसोबतच तबला निर्मितीचेही धडे खामगावच्या गजानन आणि जीवन सगट या काका-पुतण्याने मुंबईत गिरविले. तबला, पखवाज, ढोलकी आणि नाल दुरूस्तीसोबतच या साहित्याची निर्मितीही ते खामगावात करतात. मुंबई येथे गुरू हरिदास व्हटकर यांच्याकडे धडे गिरवित असताना, जागतिक किर्तीच्या कलावंतांसाठी तबला घडविण्याची संधी त्यांना मिळाली. पंडित जाकीर हुसेन, पंडित सुरेश तळवळकर, पंडित अनंत काणे यांच्यासह अनेक कलावंतांसाठी त्यांनी तबले घडविले. गजानन आणि जीवन सगट यांनी तयार केलेल्या तबल्यामध्ये वेगळीच जादू असल्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या तबल्याला मोठी मागणी आहे. संपूर्ण विदर्भातून त्यांनी घडविलेल्या तबल्याला मागणी असून वर्धा, यवतमाळ अमरावती, नागपूर येथील तबला, पखवाज, ढोलक आणि नाल गेल्या सहा-सात वर्षांपासून खामगावात दुरूस्तीसाठी येत आहेत. अनोखा तबला निर्मितीच्या छंदामुळे सगट यांची कला दूरवर पसरली आहे. मुंबई येथूनही अनेक कलावंतांना त्यांच्या तबला आणि इतर साहित्याने भुरळ घातली आहे. मुंबई येथे असताना पंडित जाकीर हुसेन यांचा तबला दुरूस्तीचेही भाग्य आपल्याला लाभले असल्याचे जीवन आणि गजानन सगट यांनी सांगितले.