अंगणवाडी सेविका, मदतनीस प्रशिक्षणाच्या देयकाचा वाद
By admin | Published: April 13, 2017 01:53 AM2017-04-13T01:53:15+5:302017-04-13T01:53:15+5:30
अकोला- काहींना कनिष्ठांच्या स्वाक्षरीशिवायच देयकावर स्वाक्षरी देत आहेत, तर काहींना कनिष्ठांच्या स्वाक्षरीसाठी वेठीस धरण्याच्या प्रकारामुळे बुधवारी दुपारी या विभागात ‘तू तू-मै मै’ झाली.
मनमानीपणामुळे प्रकल्प अधिकारी त्रस्त
अकोला : अंगणवाडीसेविका, मदतनिसांना पाच लाख रुपये निधी खर्चातून प्रशिक्षणाचे देयक अदा करण्यावरून महिला व बालविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद उद्भवत आहेत. महिला व बालविकास काहींना कनिष्ठांच्या स्वाक्षरीशिवायच देयकावर स्वाक्षरी देत आहेत, तर काहींना कनिष्ठांच्या स्वाक्षरीसाठी वेठीस धरण्याच्या प्रकारामुळे बुधवारी दुपारी या विभागात ‘तू तू-मै मै’ झाली.
अंगणवाडीसेविका, मदतनिसांना प्रशिक्षणासाठी पाच लाख रुपयांची तरतूद होती. जिल्ह्यातील आठही प्रकल्प स्तरावर हा निधी देण्यात आला. प्रशिक्षण कार्यक्रम घेतल्याचे देयक संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी तयार केले. ते मिळण्यासाठी जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी एस.पी. सोनकुसरे यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक आहे. आधी मूर्तिजापूर प्रकल्प अधिकाऱ्यांच्या ६० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या देयकावर सोनकुसरे यांनी स्वाक्षरी केली.
त्यानंतर अकोट प्रकल्प अधिकाऱ्यांनी देयक त्यांच्याकडे आणले. त्यावर सोनकुसरे यांनी स्वाक्षरी केली नाही. त्यांनी स्वाक्षरी हवी असल्यास कार्यालयातील सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, संबंधित लिपिकाची स्वाक्षरी घेण्याचे सांगितले. त्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्यांनी संबंधितांकडे धाव घेतली. मात्र, सोनकुसरे यांनी आधी स्वाक्षरी केलेल्या मूर्तिजापूरच्या देयकावर कार्यालयातील कुणाचीही स्वाक्षरी घेतली नाही. त्यामुळे अकोटच्या देयकावर स्वाक्षरी करण्याचा प्रश्नच येत नाही, असा पवित्राही संबंधितांनी घेतला. अडवणूकच करायची असेल, तर मूर्तिजापूरच्या देयकावर स्वाक्षरी करताना का केली नाही. अकोटचे देयक का अडवले, हा प्रश्नही यानिमित्ताने पुढे आला. या प्रकाराला आर्थिक लाभाची किनार असल्याची चर्चा या विभागात बराच वेळ होती.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी सोनकुसरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.