शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा संताप, पीकविमा कार्यालयाची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 04:06 PM2022-11-21T16:06:07+5:302022-11-21T16:06:43+5:30
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले
अकोला - राज्यात एकीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध नोंदवत विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, दुसरीकडे अकोल्यात स्थानिक शिवसेना नेते पीकविमा न मिळाल्याने संताप व्यक्त करत आहेत. त्यातूनच पीकविमा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेला घास पाण्यात वाहून गेला. सोयाबीन शेतीचही मोठं नुकसान झालं होतं. मात्र, अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तर, पीकविम्याचे पैसेही खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्यामुळेच, अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाने कार्यालयाची तोडफोड करत संताप व्यक्त केला.
अकोला जिल्ह्यातल्या मुर्तीजापुर येथे ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पीकविमा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पिक विमा न मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केली. शिवसेना तालुकाप्रमुख तथा मा.जि.प.सदस्य अप्पू तिडके यांनी यावेळी सरकारचा निषेध नोंदवला. तसेच, शेतकऱ्यांप्रती हे सरकार संवदेनशील नसल्याचंही ते म्हणाले.