संतप्त शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालयास लावले कुलूप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:17 AM2021-01-21T04:17:51+5:302021-01-21T04:17:51+5:30
पातूर : तालुक्यातील भंडारज बु. येथील शेतकरी राजेंद्र पातोडे यांनी शेतीच्या मोजणीसाठी अतितातडीने मोजणीचे पैसे भरले. त्यानंतर भूमी ...
पातूर : तालुक्यातील भंडारज बु. येथील शेतकरी राजेंद्र पातोडे यांनी शेतीच्या मोजणीसाठी अतितातडीने मोजणीचे पैसे भरले. त्यानंतर भूमी अभिलेख कार्यलायामार्फत दिलेल्या तारखेच्या दिवशी अधिकारी, कर्मचारी शेतात न आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने पातूर गाठत भूमी अभिलेख कार्यालयाला कुलूप लावले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत कुलूप उघडण्यात आले.
शेतकरी राजेंद्र पातोडे यांचे भंडारज बु. शिवारात सर्व्हे क्र. १२६/१ मध्ये शेती आहे. त्यांनी शेतीच्या मोजणीचा अर्ज सादर केला. अतितातडीने मोजणी करण्यासाठी त्यांनी दि. १ डिसेंबर २०२० रोजी १२ हजार रुपयांचे चालान भरून घेतले होते. पैसे भरल्यानंतर १२ डिसेंबर २०२० रोजी मोजणी नोटीस काढण्यात आली. त्यानुसार घोडके नामक भूमापक यांच्याकडे मोजणी जबाबदारी दिली. शेतीची मोजणी दि.१८ जानेवारी २०२१ रोजी असल्याचे नोटीस शेतकऱ्यास देण्यात आली. नोटीस मिळाल्याने शेतकरी राजेंंद्र पातोडे व इतर शेतकरी १८ जानेवारी रोजी शेतात भूमिअभिलेख कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाट पाहत ताटकळत बसले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत अधिकारी फिरकलेच नसल्याने संतप्त शेतकऱ्याने पातूर येथील भूमिअभिलेख कार्यालय गाठले. तेथे विचारणा केली असता ड्रोन मोजणीसाठी कर्मचारी पाठविले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मोजणी पुढे ढकलल्याबाबत शेतकऱ्यास कुठलीही सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने कार्यालयास कुलूप लावले. त्यानंतर कार्यालय प्रमुखांनी मध्यस्थी करून कुलूप उघडण्यात आले. कार्यालयामार्फत त्यांना १ फेब्रुवारी ही मोजणी तारीख देण्यात आली आहे. भूमी अभिलेख कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शेतकरी राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. (फोटो)