जनावरे पडताहेत मृत्यूमुखी, शेतकरी चिंताग्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:22+5:302021-05-14T04:18:22+5:30
अकोटः कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. माणसे मृत्युमुखी पडत आहेत. दुसरीकडे जनावरांना होणारा खुरीचा आजार अचानक ॲक्टिव्ह झाला आहे. त्यामुळे ...
अकोटः कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. माणसे मृत्युमुखी पडत आहेत. दुसरीकडे जनावरांना होणारा खुरीचा आजार अचानक ॲक्टिव्ह झाला आहे. त्यामुळे जनावरे आजारी पडत असुन काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
ग्रामीण भागात जनावरे पाळताना खुरीचा आजार विशेषतः गाई व म्हशी या जनावरांना जास्त प्रमाणात होतो. पूर्वी या आजाराने जनावर खराब होत नव्हती. मृत्यूसुद्धा होत नव्हता. जनावरांना होणारे खुरी आजाराचे चार प्रकार आहेत. परंतु यावर्षी जीवघेणा एवन नावाचा खुरी व्हायरस आला आहे. या व्हायरसमुळे आजार बळावत असून जनावरांचे अवयव निकामी होत आहेत. परिणामी अनेक जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. यावर्षी एवन खुरीचा व्हायरस मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाल्याने एका गुराला लागण झाल्यास, दोन-तीन दिवसात या गुराच्या संपर्कातील इतर जनावरे सुद्धा आजारी पडत आहेत. अचानक दुग्ध जनावरांना ताप येत आहे. मुखातून हा खुरीचा आजार होत असल्याचे लक्षणे दिसत आहेत. दरवर्षी खुरीचा आजार येत असतो. म्हणुन घरगुती उपचार करण्यात येतात. त्यामुळे जनावरांमध्ये खुरीच्या आजाराचा संसर्ग वाढत असल्याची परिस्थिती आहे. खुरीचा आजार झाल्यानंतर अथवा या आजारात जनावराचा मृत्यू झाल्यास जनावराचे नमुने घेणे आवश्यक झाले आहे.
अकोट तालुक्यात एवन खुरीची साथ!
अकोट तालुक्यात अनेक गावात जनावरांना खुरीच्या साथ रोगाची लाट पसरली आहे. याकडे पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना जनावरांची तपासणी करुन मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. अनेक शेतकरी, शेतमजूर कुटुंबांना कोरोनाची बाधा झाली आहे. उपचार घेत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत जनावरांमध्ये एवन नावाचा खुरीचा आजार बळावला आहे. त्यामुळे शेतकरी भीती व्यक्त करीत आहेत.
माझ्या शेतात २५-३० जनावरे आहेत. त्यापैकी अज्ञात व्हायरसने चार-पाच जनावरे आजारी पडली. त्यांच्यात मुखाव्दारे आजार होणाची लक्षणे दिसत आहेत. कोरोना विषाणुंचा तर जनावरांवर परिणाम होत नाही ना, अशी भीती वाटत आहे. याकडे पशुसंवर्धन खात्याने लक्ष द्यावे.
-गजानन धर्मे, शेतकरी अकोली जहाँगिर
खुरीचा वेगळा प्रकार झाल्याचे जनावरामध्ये दिसून येत आहे. यावर्षी एवन हा खुरीचा आजार बळावला आहे. या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकऱ्यांनी वेळीच जनावरांवर उपचार व काळजी घेणे आवश्यक आहे.
-डॉ. एच. आर. मिश्रा, सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी