दक्षिण मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे आॅन ड्युटी उपोषण
By admin | Published: April 27, 2017 01:17 AM2017-04-27T01:17:32+5:302017-04-27T01:17:32+5:30
अकोला- ३६ तासांच्या आॅन ड्युटी आमरण उपोषणात दक्षिण मध्य रेल्वे नांदेड डिव्हिजन डेपो अकोल्याच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
अकोला : सातवा वेतन आयोग लावण्यासोबत आठ विविध प्रलंबित मागण्यांसाठी, आॅल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन आणि आॅल इंडिया गार्ड कौन्सिलने छेडलेल्या ३६ तासांच्या आॅन ड्युटी आमरण उपोषणात दक्षिण मध्य रेल्वे नांदेड डिव्हिजन डेपो अकोल्याच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. २५ एप्रिलच्या पहाटे ८ वाजतापासून सुरू झालेले हे आंदोलन २६ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापर्यंत अकोल्यात सुरू राहिले.
सातव्या वेतन आयोगांतर्गत रनिंग स्टाफच्या वेतनात १४.२९ टक्के वाढ निश्चित करा, एचपीसीच्या रेल्वे बोर्डाच्या एलईओ चेन्नईच्या निर्देशान्वये लागू करा, एएलपीच्या विविध लेव्हल निश्चित करा, रनिंग अलाउन्स गठित एम्पॉवर समिती गोठवा, स्पॅडमधील कमीतकमी दंड बंद करा, सर्व रनिंग स्टाफला रिटायरमेंटचे फायदे ५५ टक्के सुनिश्चित करा, विना ब्रेकयान व विनागार्डच्या असुरक्षित रेल्वेचे संचालन बंद करा, गार्डला सुरक्षा श्रेणीत सहभागी करा आदी मागण्यासाठी केंद्रीय कार्यकारिणीने दिल्लीच्या जंतर-मंतरवर आणि देशातील सर्व विभागातील मुख्य कार्यालयात एकाच वेळी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. २५ आणि २६ एप्रिल रोजी तब्बत ३६ तास अन्न ग्रहण न करता आपल्या कर्तव्यावर राहतील, असे आंदोलनाचे स्वरूप होते. ३६ तासांच्या या आंदोलनात अकोल्यातील दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या अकोला डेपोने सक्रिय सहभाग नोंदविला. ८८ कर्मचारी यामध्ये प्रामुख्याने सहभागी झाले होते. हरीश बंकावार यांच्या नेतृत्वात अकोल्यातील आंदोलन यशस्वी झाले. यामध्ये शेखर भारंबे,जी.एस. बानाईत, स्वप्ना जंगले मॅडम आदी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.