अकोला मध्यवर्ती कारागृहात आणखी ५० कैद्यांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 01:26 PM2020-06-28T13:26:23+5:302020-06-28T13:30:06+5:30
कारागृहात आतापर्यंत ६८ कैदी कोरोना पॉझीटीव्ह आढळले आहेत.
अकोला : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक खेड्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर आता कारागृहात कोरोनाचा मोठा शिरकाव झाला आहे. दोन दिवसांपुर्वी १८ कैदी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर रविवारी आलेल्या अहवालात सुमारे ५० कैदी कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी वरीष्ठ पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. कारागृहात आतापर्यंत ६८ कैदी कोरोना पॉझीटीव्ह आढळले आहेत.
कारागृह प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून गत तीन महिन्यांपासून कोरोनाला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू होते; मात्र मंगळवारी रात्री कारागृहातील सुमारे १८ कैद्यांना कोरोना असल्याचा अहवाल आणि त्यानंतर रविवारी तब्बल ५० कैदी कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे समोर येताच प्रशासनाला धक्का बसला. ५ दिवसात सुमारे ६८ कैदी कोरोना पॉझीटीव्ह निघाल्याने आता कारागृहातील ४०० कैदीही धोक्यात सापडले आहेत. आतापर्यंत शहराच्या विविध भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्य वाढतीच होती; मात्र आता कारागृहातही कोरोनाने मोठा शिरकाव केल्यामुळे कारागृह प्रशासनावर मोठे संकट आले आहे. एका बरॅकमधील तब्बल १८ कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर आता विविध बरॅकमधील तब्बल ५० कैद्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला. त्यामुळे संपुर्ण कारागृहच आता कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची संख्या आधीच कमी करण्यात आली आहे. ७० पेक्षा अधिक कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले; मात्र त्यानंतरही आता कारागृहात ४०० पेक्षा अधिक कैदी असून त्यामधील ६८ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रोज सकाळी एकमेकाच्या संपर्कात आलेल्या उर्वरीत ३२२ कैद्यांनाही कोरोना होण्याचा मोठा धोका आहे. आता खबरदारी म्हणूण कैद्यांसाठी स्वतंत्र कोवीड सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहे. या ठिकाणावरुन कैदी पळून जाणार नाहीत, तसेच त्यांना उपचारही मिळावे, या दृष्टीने त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कारागृहातील ६८ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने इतर ३०० कैद्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका आजा बळावला आहे.