अमरावती विभागाला लसीचे आणखी ९१ हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 10:37 AM2021-05-27T10:37:21+5:302021-05-27T10:40:54+5:30
Corona Vaccine : अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक लसीचा पुरवठा झाला असून, अकोल्यासाठी मात्र दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा प्राप्त झाला आहे.
अकोला: मागील काही दिवसापासून अकोल्यासह विभागात कोविड लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. अशातच बुधवारी विभागासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे ९१ हजार ६०० डोस प्राप्त झाले. यामध्ये कोव्हॅक्सिनचे १३,६००, तर कोविशिल्डचे ७८ हजार डोस आहेत. अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक लसीचा पुरवठा झाला असून, अकोल्यासाठी मात्र दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा प्राप्त झाला आहे. कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना आता दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे, मात्र लसीचे पर्याप्त डोस उपलब्ध नसल्याने अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग मंदावला आहे. कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी होत असल्याने, अनेकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करावी लागत आहे. बुधवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसीचे डोस प्राप्त झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी बुधवारी सायंकाळी विभागातील पाचही जिल्ह्यांना लसीचे वितरण केले.
जिल्हानिहाय प्राप्त लस
जिल्हा - कोव्हॅक्सिन - कोविशिल्ड
अकोला - १३०० - १४,४००
अमरावती - ३५०० - २०,५००
बुलडाणा - ३००० - १६,२५०
वाशिम - ३५०० - १२०००
यवतमाळ - २३०० - १४,८५०
---------------------------
एकूण - १३,६०० - ७८०००