तुषार पुंडकर हत्याकांडातील आणखी आरोपी रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 06:00 PM2020-04-05T18:00:07+5:302020-04-05T18:00:58+5:30
या प्रकरणात अकोटातील काही उद्योजकांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.
अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर हत्याकांडातील आणखी काही आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या आरोपींच्या मागावर असून, त्यांनाही लवकरच बेड्या ठोकण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात अकोटातील काही उद्योजकांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती असून, राजकीय दृष्टीच्या दिशेनेही तपास करण्यात येत असल्याचे खात्रीलायक सूत्रांचे म्हणणे आहे.
अकोट शहर पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस वसाहतमध्ये तुषार पुंडकर यांच्यावर २१ फेब्रुवारी रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनीही दोन्ही पिस्तूलमधून गोळ्या झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तुषार पुंडकर यांच्या हत्येचा कट रचून त्यांची हत्या केल्याने पोलिसांनी अथक परिश्रम करून या प्रकरणातील आरोपी अकोट शहरातील रहिवासी पवन सेदानी, श्याम नाठे आणि अल्पेश दुधे या तीन आरोपींना २६ मार्च रोजी अटक केली. त्यानंतर निखिल सेदानी आणि गुंजन चिचोळे या दोन आरोपींनाही अटक करण्यात आली असून, दोन पिस्तूल आणि चार काडतूस जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने सुरू असून, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर प्रत्येक स्तरावर या तपासातील बाबींवर नियंत्रण ठेवून मार्गदर्शन करीत आहेत. या प्रकरणातील पाचही आरोपी पोलीस कोठडीत असून, या दरम्यान आणखी काही नावे समोर येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सदर प्रकरणात आणखी काही आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.