महाबीज पतसंस्थेतील घोटाळ्यात आणखी एक गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 02:25 PM2018-11-17T14:25:47+5:302018-11-17T14:26:06+5:30
अकोला: महाबीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेत अपहार झाल्याप्रकरणी शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशानंतर सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अकोला: महाबीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेत अपहार झाल्याप्रकरणी शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशानंतर सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदारी कारवाई पतसंस्थेच्या तत्कालीन सचिव व लिपिकावर करण्यात आली. महाबीजमध्ये दोन विविध घोटाळे करण्यात आले असून, एकामध्ये ७४ लाखांचा तर दुसऱ्या अपहार प्रकरणात १७ लाखांचा घोळ झाला आहे.
शेतकºयांची नुकसान भरपाई वितरण प्रक्रियेत घोटाळा करण्यात आला. बोगस दस्तऐवजही सादर करण्यात आले. त्यानंतर आता पतसंस्थेत बनावट पावत्या अािण बिल बुकांच्या आधारे अपहार झाल्याचे पुढे आले आहे. याबाबत अंकेक्षण अहवाल तयार करण्यात आला. त्यानंतर २० एप्रिल २०१७ रोजी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली; मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे ३ एप्रिल २०१८ रोजी पतसंस्थेकडून पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले; मात्र कारवाई न झाल्याने कलम १५६/३ अन्वये न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. याप्रकरणी विलास नानासाहेब देशमुख (तत्कालीन सचिव) व प्रभाकर अभिमान तराळे यांची नावे पुढे आली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी भारतीय दंड विधानाच्या कलम ४०८, ४०९, ४२०, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोटाळ्याची दोन प्रकरणे
महाबीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेत अपहाराची दोन प्रकरणे वेगवेगळ्या कालावधीत घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. २०१४-१५ मध्ये ७४ लाख २१ हजार आणि २०१५-१६ मध्ये १७ लाख १७ हजारांचा घोळ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंकेक्षण अहवालामध्ये हे घोटाळे उघड झाले असून, आता पोलीस तपासात या घोटाळ्याची पाळेमुळे समोर येणार आहेत.