जबरी चोरी प्रकरणातील आणखी एक पिस्तूल जप्त; आरोपींना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 09:51 AM2020-09-22T09:51:33+5:302020-09-22T09:51:44+5:30
दहीहांडा पोलिसांनी पडसोद येथील घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे आणखी एक पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आली आहेत.
तेल्हारा: वाडी अदमपूर येथील दरोडा प्रकरणातील अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना केवळ एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सोमवारी दहीहांडा पोलिसांनी पडसोद येथील घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे आणखी एक पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आली आहेत.
तालुक्यातील वाडी अदमपूर येथील ताराचंद बजाज यांच्या घरी रविवारी रात्री दरोडा टाकून १.७८ लाखांचा ऐवज आरोपी अस्लम शहा, त्याची पत्नी मुस्कान या दोघांनी लंपास केल्याची घटना घडली होती; मात्र तेल्हारा पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून दोघांना जेरबंद केले. आरोपींकडून चोरीच्या मुद्देमालासह ५.७० लाखांचा माल व धारधार शस्त्र आरोपींच्या शिवणी येथील घरातून जप्त केले, तसेच आरोपीकडून एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस हस्तगत केली. दुसऱ्या दिवशी दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पडसोद येथील शेतशिवारात पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. आणखी एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आढळून आली. आरोपीने एक पिस्तूल फेकून दिली व एक जवळ ठेवली होती, तसेच आरोपीने घरमालकाचा मोबाइल उकळी बाजार शेतशिवारात फेकून दिला असता, पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने केवळ एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नीलेश देशमुख करीत आहेत.
आरोपी हा कुख्यात गुन्हेगार
दरोडा प्रकरणातील पकडण्यात आलेला आरोपी हा कुख्यात गुन्हेगार प्रवृत्तीचा असून, यापूर्वी त्याच्यावर पुणे येथे गुन्हे दाखल आहेत. त्याने यापूर्वी अनेकदा पिस्तूलसह गुन्हे केले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
पिस्तूल आल्या कुठून?
आरोपीकडे दोन पिस्तूल व चार जिवंत काडतूस आढळून आली आहेत. हे पिस्तूल व काडतुसे आरोपीकडे कुठून आली, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आरोपिला एका दिवसाचीच पोलीस कोठडी मिळाल्याने पोलीस काय भूमिका घेतात, हे तपासात उघड होईल.