आणखी एक पोलीस हेड कॉन्स्टेबल गजाआड
By admin | Published: September 25, 2015 01:07 AM2015-09-25T01:07:51+5:302015-09-25T01:07:51+5:30
ट्रक सोडण्यासाठी चालकाकडून घेतले अडीच हजार.
अकोला: बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल संजय लांडे यांच्या लाचखोरीची घटना उलटून आठवडा होत नाही, तोच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी पातूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल काशीराम तायडे याला २५00 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पातूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली. एका ट्रकचालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, लोणार येथून वीटभट्टीसाठी लागणारी वाळू भरून तो पातूरमार्गे चोहोट्टा बाजार येथे नेत असताना, आरटीओ विभागाच्या भरारी पथकाने ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळू असल्याने पथकाने पातूर पोलीस ठाण्यात ट्रक उभा केला. त्यानंतर ट्रक सोडविण्यासाठी ट्रकचालक पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथील कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल काशीराम तुळशीराम तायडे (४८) याने चालकाकडील रॉयल्टीचा परवाना स्वत:कडे घेतला आणि ट्रक सोडण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितली. ट्रकचालक व तायडे यांच्यात तडजोड होऊन २५00 रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी पातूर पोलीस ठाण्यात सापळा रचला. हेड कॉन्स्टेबल काशीराम तायडे हा या सापळय़ात अडकला. २५00 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली. त्याचेविरुद्ध एमव्ही अँक्टनुसार कलम १२२ व १७७ गुन्हा दाखल केला.