अकोलेकरांना द्वारकासाठी आणखी एक रेल्वे; बिलासपूर-हापा एक्स्प्रेसचा ओखापर्यंत विस्तार
By Atul.jaiswal | Published: January 4, 2024 02:18 PM2024-01-04T14:18:25+5:302024-01-04T14:18:48+5:30
अकोलेकर भाविकांना द्वारका या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी आणखी एक गाडी मिळाली आहे.
अतुल जयस्वाल, अकोला: छत्तीसगड राज्यातील बिलासपूर ते गुजरात राज्यातील हापा या दोन स्थानकांदरम्यान धावणाऱ्या बिलासपूर-हापा एक्स्प्रेस या साप्ताहिक रेल्वेगाडीचा विस्तार आता ओखापर्यंत करण्यात आला आहे. ही गाडी अकोला स्थानकावरून जाणारी असल्यामुळे अकोलेकर भाविकांना द्वारका या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी आणखी एक गाडी मिळाली आहे.
रेल्वे प्रशासनातील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, २२९३९/२२९४० ओखा-बिलासपूर-ओखा या साप्ताहिक गाडीचा हापा स्टेशन पासून १७६ किमी पुढे ओखापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. २२९४० बिलासपूर-ओखा साप्ताहिक एक्स्प्रेस दर सोमवारी बिलासपूर स्थानकावरून १०:४५ वाजता रवाना होऊन त्याच दिवशी २१:४२ रोजी अकोला स्थानकावरू येणार आहे. येथून रवाना झाल्यानंतर ही गाडी दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी १८:५० वाजता ओखा येथे पोहोचणार आहे. हापा पुढे या रेल्वेला जामनगर, खंभालिया, द्वारका थांबे असतील. २२९३९ ओखा-बिलासपूर साप्ताहिक एक्स्प्रेस दर शनिवारी ओखा स्थानकावरून १९:०५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी १६:१० वाजता अकोला स्थानकावर येईल व तेथून रवाना झाल्यानंतर सोमवारी ०३:०० वाजता बिलासपूर येथे पोहोचणार आहे. रेल्वे विस्ताराचा हा बदल लवकरच केला जाणार असल्याची माहिती आहे.
अकोला येथून द्वारकाकरीता असलेल्या गाड्या
२०८१९/२०८२० पुरी ओखा द्वारका एक्प्प्रेस (नियमीत)
२२९०६/२२९०५ शालीमार-ओखा सुपरफास्ट एक्स्प्रेस (नियमीत)