कोरोनाचा आणखी एक बळी, ३० नवे पॉझिटिव्ह, चार कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 05:54 PM2020-11-18T17:54:18+5:302020-11-18T17:54:26+5:30
मुर्तीजापूर तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची आकडा २८६ वर गेला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून, बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी मुर्तीजापूर तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची आकडा २८६ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ३० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,८३६ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २८० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २५० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मोठी उमरी, गौरक्षण रोड व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, गजानन पेठ, निमवाडी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन, आळशी प्लॉट, शास्त्री नगर, पिकेव्ही, वाडेगाव, राधेनगर, गड्डम प्लॉट, देवी खदान , मलकापूर, बाळापूर, कौलखेड, विद्या नगर, हरिहरपेठ व जळगाव नहाटे येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
जामठी येथील महिलेचा मृत्यू
बुधवारी कोरोनामुळे मुर्तीजापूर तालुक्यातील जामठी बु. येथील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेस १४ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
३७७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,८३६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८१७३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३७७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.