अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी, १७ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:51 PM2021-01-01T16:51:10+5:302021-01-01T16:51:16+5:30
CoronaVirus in Akola: अकोट येथील वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३२३ वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शुक्रवार, १ जानेवारी रोजी अकोट येथील वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३२३ वर पोहोचली आहे. दरम्यान, आणखी १७ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांचा आकडा १०५०६ वर गेला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी १९५ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट, न्यु खेतान नगर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, तर कमल सोसायटी, कौलखेड, बार्शिटाकळी, कैलास नगर, कुटासा ता.अकोट, जोगळेश्वर, तारफैल, राऊतवाडी, मनकर्णा प्लॉट, खडकी व अकोला फैल येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
अकोट येथील ७७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या अकोट येथील ७७ वर्षीय पुरुषाचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांना १९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
४३६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,५०६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,७४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४३६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.