होमआयसोलेशनमधील बेफिकीर रुग्णांमुळे कोविडची दुसरी लाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 11:21 AM2021-02-14T11:21:17+5:302021-02-14T11:22:05+5:30
CoronaVirus News अनेकांकडे कोविड नियमांप्रमाणे स्वतंत्र व्यवस्था नसतानाही त्यांना होमआयसोलेशनची परवानगी देण्यात आली.
अकोला: गतवर्षी सप्टेंबर महिन्यानंतर जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घसरण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरही बंद करण्यात आले. गंभीर रुग्ण वगळता सौम्य लक्षणे व लक्षणंच नसलेल्या रुग्णांना होमआयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्याने आरोग्य विभागाचे संपूर्ण लक्ष लसीकरण मोहिमेकडे केंद्रित झाले. त्यामुळे होमआयसोलेशनमधील रुग्णांचीही बेफिकिरी वाढू लागली. परिणामी जिल्ह्यात कोविडचे नवे हॉटस्पॉट निर्माण होऊ लागले. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर बंद पडल्याने ६० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना होमआयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. यातील अनेकांकडे कोविड नियमांप्रमाणे स्वतंत्र व्यवस्था नसतानाही त्यांना होमआयसोलेशनची परवानगी देण्यात आली. त्यामुळे हे रुग्ण इतरांच्याही संपर्कात आले. रुग्णांचे कुटुंबीय देखील निर्धास्त फिरू लागल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले. केवळ रुग्णालयात दाखल रुग्णांकडे फोकस असताना जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्यामुळे आरोग्य विभागाचे संपूर्ण लक्ष लसीकरणाकडे वेधले गेले. या दरम्यान होमआयसोलेशनमधील रुग्णांचा १० दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण होऊनही त्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडाही ७७५ च्या वर पोहोचल्याचे दिसून आले. वास्तविकत: जिल्ह्यात होमआयसोलेशनमधील २३६ आणि रुग्णालयात दाखल २०६, असे एकूण ४४२ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे वास्तव समोर आहे. एकंदरीत प्रशासनाची ढिलाई अन् उपाययोजनांची नुसती कागदोपत्री पूर्तता कोविडच्या दुसऱ्या लाटेस कारणीभूत ठरल्याचे चित्र दिसून येत आहे.
लस आली अन् कोविडची भीती गेली
कोरोनावरील लस येताच अनेकांमधील कोविड विषयीची भीती गेली. त्यामुळे लोक निर्धास्त होऊन रस्त्यावर येऊ लागले. विना मास्क गर्दीच्या ठिकाणी वावरू लागल्याचे दृष्य दिसून येत आहे. मध्यंतरी प्रशासनातर्फे राबविण्यात आलेली नो मास्क नो एन्ट्री, नो मास्क नो पेट्रोल या मोहिमेला देखील लोकांनी बगल देत नियमांची सर्रास पायमल्ली केली.
२०२० मधील स्थिती
एकूण चाचण्या - ९९,४४६
पॉझिटिव्ह - १०४८९
संसर्गाचा दर - १०.५४
२०२१ मधील स्थिती
एकूण चाचण्या - २१३८३
एकूण पॉझिटिव्ह - १६७१
संसर्गाचा दर - ७.८१