अनुप धोत्रे दिल्ली दरबारी, शपथविधीपर्यंत दिल्लीतच मुक्काम!
By नितिन गव्हाळे | Published: June 6, 2024 09:37 PM2024-06-06T21:37:01+5:302024-06-06T21:37:14+5:30
खासदारांच्या बैठकीला राहतील उपस्थित, दोन दिवस गेले व्यस्ततेत
अकोला: भाजपचे उमेदवार अनुप संजय धोत्रे हे लोकसभा निवडणुकीत प्रथमच विजय मिळवून भाजपला सलग पाचव्यांदा गड सर करून दिला. मताधिक्य घटले असले तरी, त्यांच्या विजयामुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आनंदित झाले आहेत. त्यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी दोन अक्षरश: कार्यकर्ते, नागरिकांची रिघ लागली होती. बुधवारी रात्री त्यांना दिल्लीवरून फोन आला आणि गुरूवारी पहाटेच कारने नागपूर आणि तेथून विमानाने दिल्लीत दाखल झाले.
शुक्रवारी दिल्लीत भाजपच्या देशभरातील खासदारांची पक्षश्रेष्ठींना महत्त्वाची बैठक बोलावली असून, या बैठकीला खासदार अनुप धोत्रे उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी दोन दिवस शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक आणि नागरिकांनी अक्षरश: गर्दी केल्याचे दिसून आले. मंगळवारी आणि बुधवार हे दोन दिवस त्यांचे शुभेच्छा स्वीकारण्यात गेले. प्रत्येकजण त्यांना शुभेच्छा देताना, हितगुज साधत असल्याचे दिसून आले. काहींनी तर त्यांच्याकडे आपआपल्या भागातील समस्या मांडून त्याकडे लक्ष घालण्याची मागणी केली. काही लोक त्यांना निवेदन, पत्र देतानाही दिसून येत होते.
बुधवारी रात्री खासदार अनुप धोत्रे यांना दिल्लीवरून फोन आल्यावर, त्यांनी गुरुवारी पहाटेच कारने नागपूर गाठले आणि तेथून विमानाने ते दिल्लीला रवाना झाले. भाजप खासदारांची बैठक, एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांची बैठक, नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होईपर्यंत धोत्रे हे दिल्लीलाच थांबवणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बुधवारी घेतले ‘श्रीं’चे दर्शन
बुधवारी सायंकाळपर्यंत घरी येणाऱ्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर खासदार अनुप धोत्रे हे त्यांच्या भावंड, मित्रांसोबत शेगावला गेले. संत गजानन महाराज मंदिरात जाऊन त्यांनी ‘श्रीं’च्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी खामगाव येथे जाऊन आमदार ॲड. आकाश फुंडकर, सागर फुंडकर व कुटुंबीयांची भेट घेतली.
खासदार होताच, निवेदने, पत्रे सुरू
मंगळवारी (दि.४ जून) खासदारपदाची माळ अनुप धोत्रे यांच्या गळ्यात पडताच, शहरातील काही सामाजिक, धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी मंगळवारी रात्रीपासून त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. बुधवारी सायंकाळपर्यंत हा ओघ सुरू होता. यावेळी अनेकजण त्यांना शुभेच्छा देत, समस्या, मागण्यांबाबत निवेदने, पत्र देत, लक्ष घालण्याची विनंती करताना दिसत होते.