..अन टोळक्याने केले भीतीपोटी पलायन!
By admin | Published: October 1, 2015 12:09 AM2015-10-01T00:09:55+5:302015-10-01T00:09:55+5:30
गुप्तधन शोधणा-या टोळीची उमाळी परिसरात चर्चा.
उमाळी (जि. बुलडाणा) : परिसरातील एका मंदिरानजीक रात्री ८ वाजताच्या सुमारास जमलेल्या काहींनी गावातील एक नागरिक दिसताच पलायन केल्याचा प्रकार २९ सप्टेंबरला उघडकीस आला. गुप्तधन शोधण्यासाठी आलेली ही टोळी असावी, असा कयास ग्रामस्थांच्या चर्चेतून लावल्या जात आहे. दुसरीकडे मलकापूर ग्रामीण पोलिसांना याची भनक लागल्यानंतर त्यांनी उमाळी गाव गाठून तेथून एमएच 0४ - बीवाय - ६८१४ क्रमांकाचे बेवारस वाहन ताब्यात घेतले आहे. रात्री जवळपास ३ वाजेपर्यंंत मलकापूर ग्रामीण पोलिसांनी या घटनेतील नेमके तथ्य शोधण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या चर्चेनुसार, गाव परिसरात दुचाकीवर गेल्या तीन दिवसांपासून काही लोक फिरत होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास उपरोक्त वाहनातून काही लोक मंदिर परिसरात आले होते. गावातील एक व्यक्ती रात्री शेतात जात असताना या मंदिराजवळून गेली. त्याला या अज्ञात व्यक्तींनी पाहिले असता, त्यांनी तेथून धूम ठोकल्याची चर्चा सध्या उमाळी ग्रामस्थामध्ये रंगली आहे. गुप्तधनाच्या लालसेपोटी हे लोक तेथे आले होते. जवळपास दहा ते ११ जण होते, अशी अशी चर्चा आहे. त्यांनी रात्री मंदिराजवळच जेवण केले. मंदिराच्या मागील बाजूस एक खड्डाही खोदला असल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.गेल्या तीन दिवसांपासून या भागात काही लोक दुचाकीवर फिरत होते. दरम्यान, गावातील एक व्यक्ती शेतात जात असताना त्यांना हे लोक दिसले; मात्र भीतीपोटी या टोळक्याने तेथून पलायन केले. या दरम्यान त्यांचे वाहन मात्र तेथेच राहून गेले. मलकापूर ग्रामीण पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.