आपोतीकर यांचे निधन
By admin | Published: January 7, 2017 02:40 AM2017-01-07T02:40:15+5:302017-01-07T02:40:15+5:30
मुंबई येथे झाले निधन ; शनिवारी आपातापा येथे अंत्यसंस्कार.
आपातापा(अकोला), दि. ६- कोळी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक व राजकीय नेते, एसटी महामंडळाचे माजी सदस्य, माजी आमदार रावसाहेब ऊर्फ माणिकराव आपोतीकर यांचे ६ जानेवारीला सकाळी ७ वाजता मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. उद्या ७ जानेवारी, शनिवार रोजी दुपारी १२ वाजता, बारुला विभागातील कर्मभूमी आपोती खुर्द, येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बारुला विभागातील आपोती खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब ऊर्फ रामचंद्र आपोतीकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र माजी आमदार रावसाहेब आपोतीकर यांच्यावर गत ४-५ महिन्यां पासून मुंबई येथे वैद्यकीय उपचार सुरू होते; परंतु त्यांचे अवयव उपचाराला साथ देत नसल्या कारणाने अखेर वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. सन १९७८ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बोरगाव मंजू मतदारसंघातुन ते विदर्भातून सर्वाधिक मतांनी विजयी झाले होते. विशेष म्हणजे वयाच्या सव्वीसाव्या वर्षी ते निवडून आले होते व त्यावेळी ते सर्वात कमी वयाचे आमदार ठरले. केवळ कमी वय असल्याने त्यावेळच्या शासनामध्ये मंत्री पद मिळाले नव्हते; परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ते सदस्य झाले. अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून १0 वर्षे कार्यरत होते. तसेच अनेक पदांवर त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली होती. विविध सामाजिक संघटनांमध्ये त्यांचा सहभाग होता. नागरीकांमध्ये आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात. नेहरू, गांधी घराणे, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील अशा परिवारांशी त्यांची जवळीक होती. त्यांच्या मागे दोन मुले, मुली, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.