मोर्णाच्या विकासासाठी दानशूर व्यक्तींना आवाहन, निधीतून केली जाणार घाट निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 05:55 PM2018-03-15T17:55:39+5:302018-03-15T17:55:39+5:30
लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व त्यांच्या पत्नी तथा वाशिमच्या जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी आपले एक महिन्याचे वेतन दिले आहे.
अकोला : लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व त्यांच्या पत्नी तथा वाशिमच्या जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी आपले एक महिन्याचे वेतन दिले आहे. जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज झालेल्या छोटे खानी कार्यक्रमात स्वत: जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे रु. 62 हजारांचे दोन धनादेश सुपूर्द केले. एकूण 1 लाख 24 हजार रुपयांच्या या निधीतून नदी काठी घाट निर्मिती, सुंदर बगीचा, शोष खडडे तयार करण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला दि. 13 जानेवारीपासून प्रारंभ झाला. लोकसहभागातून ही नदी मोठया प्रमाणात स्वच्छ करण्यास यश मिळाले आहे. लहानांपासून मोठयापर्यंत सर्वांनी मोर्णाची स्वच्छता केली. मात्र नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत मोर्णाचा स्वच्छता केली जाणार आहे, या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दर शनिवारी नागरिक मोर्णाच्या स्वच्छतेसाठी नदी काठी एकत्र येत आहेत.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून मोर्णाची दखल घेतल्यानंतर हे अभियान राष्ट्रीय पातळीवर पोहोचले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अकोलेकरांचे कौतुक केल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोर्णाच्या स्वच्छतेबरोबरच जिल्हा प्रशासनाने मोर्णाचा विकास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या कामासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी आपले योगदान देण्याचा निश्चय केला. लोकप्रतिनिधींही आपल्या स्थानिक विकास निधीतून मोर्णाच्या विकासासाठी निधी दिल्याने नदीकाठी विविध विकास कामांना गती आली आहे. नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातही मोर्णाच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, सदर कार्यक्रम प्रसंगी राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक राजेश कावळे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विजय माने, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर अंबेकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे आदी उपस्थित होते.
मोर्णाच्या विकासासाठी दानशूर व्यक्तींना आवाहन
मोर्णाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी दानशूर व्यक्तींने आपले योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. प्राप्त निधीतून नदीकाठी घाट, बगीचा, लाईटींगची व्यवस्था, हॉकर्स झोन, कुंपण यासह विविध विकास कामे केली जाणार आहेत, त्यामुळे सढळ हाताने मोर्णाच्या विकासासाठी दानशूर व्यक्तींनी मदत दयावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. ज्यांना धनादेशाव्दारे निधी दयावाचा आहे, त्यांनी ‘जिल्हाधिकारी, अकोला, मिशन क्लीन मोर्णा’ या नावाने खाते क्रमांक - 0511102000015482 (बँकेचे नाव – आयडीबीआय बँक, अकोला, आयएफसी कोड - आयबीकेएल 0000511) या क्रमाकांवर धनादेश जमा करता येऊ शकेल.