दारू दुकानाविरोधातील अर्ज सह्या कमी पडल्याने फेटाळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:38 AM2017-07-21T02:38:34+5:302017-07-21T02:38:34+5:30
मूर्तिजापूर : पडताळणीत ६० सह्या पडल्या कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर: खानापूर रोडवरील ढोणे नगराजवळील दारूचे दुकान बंद करण्यासाठी प्रवीण इंगळे यांच्यासह काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या अनुषंगाने २० जुलै रोजी सकाळी १०.३० ते ५ वाजेपर्यंत खानापूर ग्रामपंचायत कार्यालयात सह्यांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये ६० सह्या कमी पडल्यामुळे तक्रार अर्ज फेटाळण्यात आला आहे.
खानापूर ग्रामपंचायतमध्ये ८११ महिला मतदार आहेत. त्याच्या २५ टक्के म्हणजे २०३ महिलांच्या सह्यांची पडताळणी होणे गरजेचे होते. त्यामुळे पडताळणीत तेवढ्याच महिलांच्या सह्या पाहिजे होत्या.
प्रत्यक्षात तक्रार अर्जावर २२९ सह्या होत्या. त्यापैकी पडताळणीत १४३ महिला अर्थात १६.२२ टक्के महिलाच सह्यांसाठी उपस्थित होत्या. परिणामी, सह्यांच्या आवश्यक कोट्यापेक्षा ६० महिलांच्या सह्या कमी पडल्या. त्यामुळे तक्रारकर्त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे आता या विषयावर मतदान होणार नाही व दारूचे दुकानसुद्धा बंद होणार नाही.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राजेश काळे यांच्या मार्गदर्शनाखालील स्वाक्षरी पडताळणी पथकामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक आनंद काळे, मूर्तिजापूरचे दुय्यम निरीक्षक शैलेंद्र ठाकूर, त्यांचे कॉन्स्टेबल, खानापूर ग्रामपंचायतचे सरपंच गजानन धाडसे, उपसरपंच सुरेश कावळे, ग्रामसेवक वैशाली खाकरे, नायब तहसीलदार नीलेश मडके, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पातुर्डे, पातूरचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्यासह त्यांचे अधीनस्थ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.