विभागातील ३0७ अप्रशिक्षित शिक्षकांनी भरले ‘डीईएलएड’साठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:16 AM2017-09-16T01:16:45+5:302017-09-16T01:16:45+5:30
अकोला: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ नुसार राज्यातील शाळांमध्ये ३१ मार्च २0१९ नंतर अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक चालणार नाहीत. त्यामुळे या शाळांमधील अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी संसदेने प्रस्ताव पारित करून, ३१ मार्च २0१९ पर्यंत मुदत दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ नुसार राज्यातील शाळांमध्ये ३१ मार्च २0१९ नंतर अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक चालणार नाहीत. त्यामुळे या शाळांमधील अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी संसदेने प्रस्ताव पारित करून, ३१ मार्च २0१९ पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे अमरावती विभागातील ३0७ अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांनी डीईएलएडसाठी ऑनलाइन अर्ज भरून राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थानमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.
अप्रशिक्षित शिक्षकांनी आरटीई अँक्टनुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये डीएड, बीएड धारक शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करायचे आहे. परंतु, हजारो अप्रशिक्षित शिक्षक शाळांमध्ये शिकविण्याचे काम करतात. आरटीई अँक्ट लागू झाल्यापासून त्यांना पाच वर्षांच्या आत प्रशिक्षित होणे गरजेचे होते; परंतु अनेक शिक्षकांनी दुर्लक्ष केले. परंतु, आता त्यांच्या नोकरीवर गदा येऊ नये आणि त्यांनी प्रशिक्षित व्हावे, यासाठी केंद्र शासनाने त्यांना ३१ मार्च २0१९ पर्यंत डीईएलएड, बीएड पदविका प्राप्त करून देण्यासाठी मुदत दिली आहे. अप्रशिक्षित शिक्षकांना राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थानच्या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अमरावती विभागातील ३0७ शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज करून प्रवेश निश्चित केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील वैयक्तिक मान्यता दिलेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थान (एआयओएस) योजनेंतर्गत डीएड, बीएड पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. यानंतरही पदविका प्राप्त न करणार्या शिक्षकांना यापुढे काम करता येणार नसल्याचे विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी स्पष्ट केले.
पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद
अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना सेवेत रुजू झाल्यानंतर पहिल्या चार वर्षांत सेवांतर्गत प्रशिक्षित करण्यासाठी पत्राद्वारा प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती; परंतु केंद्र शासनाच्या निर्णयानुसार सर्व अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांनी केवळ राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्थान (एनआयओएस) यांच्यामार्फतच ऑनलाइन डीएलएड, बीएड पदविका प्राप्त करणे अनिवार्य आहे. त्यामुळे सद्यस्थितीत राज्यात अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांसाठी सुरू असलेल्या पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करण्यात येत आहे. मात्र, २0१७ व १८ या शैक्षणिक वर्षासाठी द्वितीय वर्षाला असलेल्या शिक्षकांचे सत्र सुरू राहील, असे शासनाने स्पष्ट केले आहे.