महावितरणच्या पेमेंट वॉलेटसाठी ४ हजारावर अर्ज; मंजुरीची प्रक्रिया मात्र ठप्प
By atul.jaiswal | Published: September 4, 2019 11:51 AM2019-09-04T11:51:50+5:302019-09-04T11:59:52+5:30
मोठ्या प्रमाणात अर्ज आल्यामुळे महावितरणने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अर्जांना मंजुरी देण्याची प्रक्रिया तूर्तास थांबविली आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला: वीज बिल भरणा प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासोबतच वीज ग्राहकांना या प्रक्रियेत सामावून घेत त्यांना अर्थार्जनाची संधी देण्यासाठी महावितरणने ‘लाँच’ केलेल्या पेमेंट वॉलेटसाठी राज्यभरातून ४ हजारावर अर्ज दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्यामुळे महावितरणने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अर्जांना मंजुरी देण्याची प्रक्रिया तूर्तास थांबविली आहे. त्यामुळे वॉलेटधारक होणाऱ्यांचा संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर येत असलेल्या ‘मॅसेज’मुळे हिरमोड होत आहे.
महावितरणने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार मार्गदर्शनाखाली स्वत:चे पेमेंट वॉलेट आणले आहे. आवश्यक अटींची पूर्तता करणाºया १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉलेटधारक होता येते. यातून वीज ग्राहकांना विशेषत: ग्रामीण भागात वीज बिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रती बिल पावतीमागे ५ रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी राज्यातील जवळपास ४ हजार नागरिकांनी पेमेंट वॉलेटसाठी अर्ज दाखल केले आहेत. पेमेंट वॉलेटसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक, गुमास्ता प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रद्द केलेला धनादेश आदी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्या संकेतस्थळावर अपलोड कराव्या लागाव्या लागतात. अपलोड झालेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर महावितरण मुख्यालयाकडून संबंधित व्यक्तीस पेमेंट वॉलेट मंजूर केल्या जाते. मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळे कागदपत्रांची पडताळणी करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे महावितरणने तूर्तास ‘पेमेंट वॉलेट’ मंजुरीची प्रक्रिया थांबविली असल्याची माहिती महावितरणमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
केवळ ३०० ‘वॉलेट’ मंजूर
पेमेंट वॉलेटसाठी राज्यभरातून ४ हजारावर नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रेही जोडली आहेत; परंतु आतापर्यंत जवळपास ३०० अर्जच मंजूर झाले आहेत. इतरांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती आहे.
‘महापॉवर पे’ नामकरण
महावितरणने १२ जुलै २०१९ रोजी ‘पेमेंट वॉलेट’ आणले. तेव्हापासून हे वॉलेट अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता या वॉलेटचे नामकरण ‘महापॉवर पे’ असे करण्यात आले आहे.
पेमेंट वॉलेटसाठी मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत. कागदपत्रांची पडताळणी करून असलेल्या त्रुटी दूर करण्यात वेळ जात असल्यामुळे नव्याने अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया तूर्तास थांबविण्यात आली आहे.
- पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई