अर्ज दहा हजार; ९५ लाभार्थींंची करावी लागणार निवड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:18 AM2021-02-13T04:18:31+5:302021-02-13T04:18:31+5:30
अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरांचे वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ...
अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरांचे वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३३३ लाभार्थींचे अर्ज प्राप्त झाले. उपलब्ध निधीनुसार प्राप्त अर्जांमधून योजनेंतर्गत ९५ लाभार्थींची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे दुधाळ जनावरे वाटपासाठी लाभार्थींची निवड करण्यासाठी समाजकल्याण विभागाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील मागासवर्गीय लाभार्थींसाठी दुधाळ जनावरे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभर्थींना प्रत्येकी १ लाख २५ हजार रुपयांच्या रक्कमेतून दोन म्हशींंचे वाटप करण्यात येते. १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीतून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समितीस्तरावर लाभार्थींकडून अर्ज स्वीकारण्यात आले होते. योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३३३ लाभार्थींकडून अर्ज प्राप्त झाले असून, उपलब्ध १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीतून दुधाळ जनावरांचे वाटप करण्यासाठी ९५ लाभार्थींची निवड करावयाची आहे. त्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत लवकरच लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे दुधाळ जनावरांचे वाटप योजनेंतर्गत प्राप्त १० हजार ३३३ अर्जांमधून ९५ लाभार्थींची निवड करण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरांचे वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३३३ लाभार्थींकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. योजनेंतर्गत उपलब्ध तरतुदीनुसार प्राप्त अर्जांमधून ९५ लाभार्थींची निवड लवकरच जिल्हा परिषद समाकजल्याण समितीच्या सभेत करण्यात येणार आहे.
-आकाश शिरसाट
सभापती, समाजकल्याण, जिल्हा परिषद