हरभऱ्याला पीक विमा लागू करा!
By admin | Published: April 10, 2017 01:22 AM2017-04-10T01:22:19+5:302017-04-10T01:22:19+5:30
अकोला- हरभरा पिकाचा समावेश पीक विम्यात करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शेतकरी आघाडीच्यावतीने कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भाजप शेतकरी आघाडीची मागणी
अकोला : खारपाणपट्ट्यात येत असलेल्या अकोला तालुक्यात रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या पीक विमा योजनेतून वगळून त्याऐवजी गहू पिकाचा समावेश करण्यात आला आहे. या भागात सर्वत्र हरभऱ्याचा पेरा असून, शेतकऱ्यांनी या पिकाचा विमाही काढला आहे; परंतु आता या पिकाला विमा योजनेतून वगळण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे हरभरा पिकाचा समावेश पीक विम्यात करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शेतकरी आघाडीच्यावतीने कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तालुक्यात गव्हाचा पेरा अत्यंत कमी असतानाही शासनाने मुख्य पीक असलेल्या हरभऱ्याला पीक विमा योजनेतून वगळून गव्हाचा समावेश केला आहे. कृषी विभागाच्या चुकीच्या नियोजनाने तालुक्यात हरभऱ्याचा प्रचंड पेरा असतानाही या पिकाला विम्याचे छत्र देण्यात आले नाही. ही बाब शेतकऱ्यांची थट्टा करण्यासारखी आहे. त्यामुळे शासनाने तातडीने तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या पिकाचा समावेश पीक विम्यात करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष श्रीकांत भुईभार, केशव ताठे, मनोज गावंडे, प्रकाश अवारे, नितीन देशमुख, मंगेश ढोरे, विजय भुईभार, शशिकांत अवारे, अभिजित भुईभार, रामकृष्ण ताथोड, आनंद ताथोड, श्रीकांत गोंडचवर, रवींद्र गोंडचवर, गजानन ताथोड, दिनेश लांडे, दिलीप भुईभार आदींच्या स्वाक्षरी आहेत.