राज्यात मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 10:35 AM2021-03-23T10:35:49+5:302021-03-23T10:36:03+5:30
Appointment of honorary wildlife rangers बुलडाणा, वाशीममध्ये प्रत्येकी एक तर अकोला जिल्ह्यात दोघांची नियुक्ती झाली आहे.
अकोला : पर्यावरण, निसर्ग, वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी वनविभाग व सर्वसामान्य जनता यांच्यात जनजागृतीची महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्याच्या मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. वऱ्हाडातील बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात एक तर अकोला जिल्ह्यात दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निसर्गाविषयीची आवड आणि जिज्ञासेपोटी निसर्गातील पशुपक्ष्यांसह पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या कृतिशील अभ्यासक लोकांमधून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम-४ नुसार मानद वन्यजीव रक्षकांंची नियुक्ती शासनाच्या महसूल व वनविभागाकडून तीन वर्षांकरिता केली जाते. २९ जून २०१७ साली शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांकरिता मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्तीचा शासननिर्णय जाहीर केला होता. या शासननिर्णयाचा कालावधी गेल्या जून २०२० महिन्यात पूर्ण झाला. सोमवारी शासनाने पुढील तीन वर्षांसाठी वऱ्हाडातील जिल्ह्यांमध्ये मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रफळाचा आवाका तसेच जिल्ह्यातील वनसंपदा, वन्यजीव संपदा आदी बाबी लक्षात घेता कोठे दोन तर कोठे एक याप्रमाणे मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केली आहे.
वऱ्हाडात चौघांची झाली नियुक्ती
वऱ्हाडातील अकोला जिल्ह्यात बाळ ऊर्फ जयदीप काळणे, विक्रम राजुरकर, बुलडाणा जिल्ह्यात मनजितसिंग सिख तर वाशीम जिल्ह्यात गौरव इंगळे यांची नियुक्ती झाली आहे.