भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती

By आशीष गावंडे | Published: September 17, 2022 08:34 PM2022-09-17T20:34:21+5:302022-09-17T20:34:49+5:30

१० हजार २७२ श्वानांंच्या नसबंदीबाबत प्रश्नचिन्ह

Appointment of new contractor for sterilization of stray dogs | भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती

भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती

Next

अकोला: शहराच्या कानाकोपऱ्यात भटक्या श्वानांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना सातत्याने घडून येत आहेत. या पृष्ठभूमीवर महापालिका प्रशासनाने यापूर्वी नसबंदीसाठी केलेला कंत्राट रद्द करीत नवीन कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. आजवर शहरातील १० हजार २७२ भटक्या कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी कुत्र्यांचा उच्छाद लक्षात घेता यापूर्वी करण्यात आलेला नसबंदीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मोकाट कुत्र्यांचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर श्वानांच्या नसबंदीचा सर्वात पहिला प्रयाेग महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी केला हाेता.

२०१६ मध्ये त्यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून अत्यल्प दरात कुत्र्यांच्या नसबंदीला सुरुवात केली. यानंतर तत्कालीन आयुक्त निमा अराेरा यांनी नसबंदीसाठी साेसायटी फाॅर अनिमल प्राेटेक्शन या संस्थेची नियुक्ती केली. या संस्थेने सव्वा वर्षाच्या कालावधीत १० हजार पेक्षा अधिक श्वानांची नसबंदी केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. नसबंदीसाठी संस्थेला प्रति श्वान बाराशे रुपये अदा करण्यात आले. नसबंदी करण्यात आलेल्या श्वानांची संख्या लक्षात घेतल्यास मनपाला १ काेटी २३ लक्ष रुपये अदा करावे लागतील. तूर्तास मनपाने ९० लक्ष रुपयांचे देयक अदा केल्याची माहिती आहे. 

मनपाने केली नवीन कंत्राटदाराची नियुक्ती

जुन्या कंत्राटदारा मार्फत नसबंदीची प्रक्रिया संथ गतीने होत असल्याची बाब समोर आल्यानंतर मनपा प्रशासनाने नव्याने निविदा प्रसिद्ध केल्या. यादरम्यान, प्रशासनाकडे विविध संस्थांचे चार अर्ज प्राप्त झाले. यामध्ये सर्वात कमी एक हजार ५० रुपये दर असलेल्या नवसमाज बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार या संस्थेची निवड करण्यात आल्याची माहिती आहे.

नसबंदी केलेल्या श्वानांना ओळखणार कसे?

मागील सव्वा वर्षांच्या कालावधीत मनपाने नियुक्त केलेल्या संस्थेने दहा हजार २७२ भटक्या श्वानांची नसबंदी केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नसबंदी केल्यानंतरही भटक्या श्वानांची समस्या व त्यांचा धुडगूस कायमच आहे. नसबंदी केलेल्या कुत्र्यांचे कान 'व्ही' आकाराचे करण्यात आल्याचा दावा मनपाकडून केला जातो. तरीही अशा कुत्र्यांची अचूक संख्या समजनार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Appointment of new contractor for sterilization of stray dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.