आता मानधनावर होईल उपायुक्त पदासाठी नियुक्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:01 PM2019-03-09T13:01:15+5:302019-03-09T13:01:28+5:30
अकोला: मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, ती तातडीने भरण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपासह राज्य शासन उदासीन असल्याचे चित्र आहे.
अकोला: मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, ती तातडीने भरण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपासह राज्य शासन उदासीन असल्याचे चित्र आहे. प्रशासकीय कारभार विस्कळीत होत असल्यामुळे महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी आता रिक्त असलेल्या उपायुक्त पदासाठी मानधनावर सेवानिवृत्त अधिकाºयाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, तसा आदेश जारी केला आहे. अकोला महापालिकेची राज्यात असणारी ख्याती लक्षात घेता मनपा आयुक्तांचा हा प्रयोग कितपत यशस्वी होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मनपातील उपायुक्तांची दोन्ही पदे रिक्त असून, कहर म्हणजे मुख्य लेखा परीक्षकाचे पदही रिक्त आहे. शहर अभियंता पदासह विविध महत्त्वाची पदे रिक्त असल्याचा परिणाम मनपाच्या प्रशासकीय कारभारावर होत आहे. उपायुक्त सुमंत मोरे यांची बदली झाल्यानंतर आज रोजी उपायुक्त प्रशासन आणि उपायुक्त विकास या दोन्ही पदांचा सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, पूनम कळंबे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. रिक्त पदांवर सक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी शासनाकडे वारंवार शिफारस पत्र सादर केल्याचा दावा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडून केला जातो. त्यानुषंगाने शासनाने उपायुक्त पदासाठी नुकतेच विजयकुमार म्हसाळ यांचा नियुक्ती आदेश जारी केला. अद्याप म्हसाळ मनपात रुजू न झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. या सर्व बाबी ध्यानात घेता तसेच प्रशासकीय कामकाजाची गाडी रुळावर आणण्यासाठी आयुक्त संजय कापडणीस यांनी उपायुक्त पदासाठी थेट मानधन तत्त्वावर सेवानिवृत्त अधिकाºयाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निर्देश त्यांनी जारी केले आहेत.
वाशिम येथील अधिकाºयाची होणार नियुक्ती!
मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी वाशिम जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केल्याची माहिती आहे. मनपात आयुक्तपदी रुजू होण्यापूर्वी संजय कापडणीस वाशिम जिल्हा परिषदेत कार्यरत होते, हे येथे उल्लेखनीय.