निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:52+5:302021-06-25T04:14:52+5:30
अकोला:जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक ...
अकोला:जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवार, २३ जून रोजी दिला.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने २२ जून रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार अकोला जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी तालुकानिहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो), अकोट तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी अकोट, अकोला तालुक्यासाठी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी, बार्शीटाकळी तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बाळापूर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी बाळापूर व पातूर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून, संबंधित तहसीलदारांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. निवडणुकीच्या तारखांची सूचना व निवडणूक कार्यक्रम मंगळवार, २९ जून रोजी जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूक विभागाचे प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.