पातूर तालुक्यातील रोहयो कामांच्या तपासणीसाठी दहा पथकांची नियुक्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:20 PM2020-02-01T12:20:37+5:302020-02-01T12:20:42+5:30
दहा विशेष तपासणी पथकांसह ही चौकशी वेळेत पूर्ण करण्यासाठी चार सनियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पातूर तालुक्यात ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याने, पातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या रोहयो कामांची सखोल तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी २९ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार दहा विशेष तपासणी पथकांसह ही चौकशी वेळेत पूर्ण करण्यासाठी चार सनियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पातूर तालुक्यात रोहयोच्या कामांत अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे काही प्रकरणात निदर्शनास आल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना दिली होती. तसेच पातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या रोहयो कामांची विशेष तपासणी पथकाकडून सखोल तपासणी करण्याची विनंतीही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार पातूर तालुक्यात १ एप्रिल २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या रोहयो कामांची सखोल तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी २९ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येकी तीन सदस्यांचा समावेश असलेल्या दहा विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांत अकोला जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांतील अधिकारी, कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यामध्ये पथक प्रमुख म्हणून तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि सदस्य म्हणून पंचायत समितीचे कृषी अधिकारी, सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता तसेच तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनांचा समावेश आहे. यासोबतच या कामांची तपासणी वेळेत पूर्ण करण्यासाठी वाशिमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार, कार्यकारी अभियंता डी. पी. गव्हाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. वासनिक, लेखाधिकारी जी. एम. चौधरी इत्यादी चार सनियंत्रण अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.