अकोट बाजार समितीवर त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:18 AM2021-04-25T04:18:38+5:302021-04-25T04:18:38+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कालावधी संपलेला असल्याने बाजार समितीच्या संचालक मंडळाचे सदस्यांचे पदे रिक्त झाले होते. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कालावधी संपलेला असल्याने बाजार समितीच्या संचालक मंडळाचे सदस्यांचे पदे रिक्त झाले होते. शासनाने मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश जिल्हा निबंधकांना दिला होता. त्यामुळे जिल्हा निबंधकांनी त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त केले. या नियुक्तीचे आदेश घेऊन दि. २३ एप्रिल रोजी बाजार समितीमध्ये प्रशासक मंडळाने पदभार घेतला. यावेळी प्रशासक मंडळाने दिलेल्या पदभार अहवालात दि. २३ एप्रिल रोजी दुपारी बाजार समितीमध्ये प्रशासकाचा पदभार घेण्यासाठी गेलो असता सचिव राजकुमार माळवे हे कार्यालयात आले नव्हते, तर सहसचिव विनोद कराळे दुपारनंतर रजेवर गेले होते. तसेच संचालक सभा इतिवृत्त नोंदवही सचिवाच्या ताब्यात बंद कपाटात ठेवले होते. त्यामुळे स्वतंत्र नोंदवही तयार करून पदभार घेण्याची कार्यवाही करण्यात आली. या नोंदवहीत जिल्हा निबंधक आदेशाच्या प्रती बाजार समितीस बजावण्यात आल्या त्यानंतर पदभार घेतल्याचा अहवाल शासनाला तसेच विभागीय व जिल्हा निबंधकांना सादर करण्याबाबत ठरविण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले. विशेष म्हणजे प्रशासक मंडळ पदभार घेण्यासाठी आले असता हजेरी पत्रकावर हजर असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेपूर्वी कार्यालयातून काढता पाय घेतल्याची माहिती आहे.