राष्ट्रवादीच्या महानगराध्यक्षपदी विजय देशमुख यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:19 AM2020-12-31T04:19:22+5:302020-12-31T04:19:22+5:30
मागील वर्षभरापासून महापालिका क्षेत्रात कमालीच्या निष्क्रिय ठरलेल्या राष्ट्रवादी पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी प्रदेश पातळीवर पक्ष संघटनेत फेरबदल करण्याच्या हालचाली ...
मागील वर्षभरापासून महापालिका क्षेत्रात कमालीच्या निष्क्रिय ठरलेल्या राष्ट्रवादी पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी प्रदेश पातळीवर पक्ष संघटनेत फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू हाेत्या. २०१४ मधील माेदीलाटेत अनेक राजकीय पक्षांचा सुपडा साफ झाल्यानंतर विजय देशमुख यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा साेपविण्यात आली हाेती. कालांतराने जिल्हा व शहर कार्यकारिणीत फेरबदल हाेऊन अनेकांवर जबाबदारी साेपविण्यात आली. महापालिका क्षेत्रात पक्षाचे संघटन कागदाेपत्री शिल्लक असल्याचे चित्र समाेर आले. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पक्षाने जुन्याजाणत्या व सर्वांना साेबत घेऊन चालणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा प्रवाहात आणण्याच्या धाेरणातून महानगराध्यक्षपदाची सूत्रे विजय देशमुख यांच्याकडे साेपविल्याचे दिसत आहे. आगामी जुलै २०२१ मध्ये अकाेला, वाशिम, बुलडाणा स्वायत्त संस्थांची (विधान परिषद) निवडणूक हाेऊ घातली आहे. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक हाेइल. शहरातील राजकारणाचा अनुभव गाठीशी असलेले विजय देशमुख पक्षाला कितपत यश मिळवून देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
प्रदेश संघटन सचिवपदी कृष्णा अंधारे
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कृष्णा अंधारे यांची प्रदेश संघटन सचिवपदी नियुक्ती केली. पक्षाने साेपविलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडणार असल्याची भावना यावेळी कृष्णा अंधारे यांनी व्यक्त केली.
दिग्गजांना हादरा; जुळवून घेण्याची तयारी
राष्ट्रवादीतही गटातटांचे राजकारण असून शहरात विजय देशमुख यांच्या गटाचा कायम दबदबा असल्याचे दिसून येते. देशमुख यांची काेणत्याही परिस्थितीत महानगराध्यक्षपदी वर्णी लागू नये, यासाठी दुसऱ्या गटाकडून अताेनात प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. परंतु, पक्षाने पुन्हा संधी देताच काही दिग्गजांनी देशमुख यांच्यासाेबत जुळवून घेण्याचे प्रयत्न चालविल्याची माहिती आहे.