बार्शिटाकळी शहरासाठी २४ काेटींच्या पाणीपुरवठा याेजनेस मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:58 AM2021-01-08T04:58:58+5:302021-01-08T04:58:58+5:30
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत बार्शिटाकळी शहराकरिता कायमस्वरूपी पिण्याच्या पाणी पुरवठ्याचा नगरपंचायतने पाठविलेला प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित होता. ...
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत बार्शिटाकळी शहराकरिता कायमस्वरूपी पिण्याच्या पाणी पुरवठ्याचा नगरपंचायतने पाठविलेला प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित होता. काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे याकडे दुर्लक्ष झाले हाेते. मात्र ७ जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयाेजित सभेत २३ कोटी ८९ लाख रुपयांच्या प्रस्ताव मान्यतेचा मार्ग माेकळा झाला आहे. बार्शिटाकळी शहरासाठी २३ कोटी ८९ लाख रुपयांचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाणीपुरवठा याेजनेचा प्रस्ताव तांत्रिक मान्यता घेऊन बार्शिटाकळी नगरपंचायतने शासनाकडे पाठविला होता. यापूर्वीच शासनाने काटेपूर्णा जलाशयात बार्शिटाकळी शहराकरिता o.९९८ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. या प्रस्तावानुसार काटेपूर्णा जलाशय महान येथून पाइपलाइन, ३.५ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प, बार्शिटाकळी शहरात दोन पाण्याच्या टाक्या व संपूर्ण शहरात ४८ किलोमीटरचे पाणी घरोघरी पोहाेचविण्यासाठी पाइपलाइनचे जाळे याचा खर्च २३ कोटी ८९ लाख रुपये तांत्रिक मान्यता असलेला प्रस्ताव शासन दरबारी कोविडमुळे प्रलंबित होता. या प्रस्तावास गुरुवारी ऑनलाइन सभेत मान्यता देण्यात आली. राज्यातील इतर नगरपंचायतसोबत बार्शिटाकळी नगरपंचायतने पाठविलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ऑनलाइन सभेत पाणीपुरवठामंत्री, नगरविकासमंत्री, संबंधित सचिव, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे, नगराध्यक्ष मेहफुज खान, मुख्याधिकारी स्नेहल राहाटे, पाणीपुरवठा अभियंता योगेश तायडे उपस्थित होते.