चार गावांत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मंजुरी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
By संतोष येलकर | Published: June 23, 2024 02:39 PM2024-06-23T14:39:52+5:302024-06-23T14:41:29+5:30
कूपनलिका, विंधन विहिरींची कामे
अकोला : पावसाळा सुरू होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी, जिल्ह्यात अद्याप सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांत पाणीटंचाईची समस्या कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर चार गावांतील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवार, दि. २१ जून रोजी दिला. त्यामध्ये तीन कूपनलिका व एक विंधन विहिरीच्या उपाययोजनांचा समावेश आहे.
यंदाचा उन्हाळा संपला असून, गेल्या दि. १ जूनपासून पावसाळा सुरू झाला. वीस दिवस उलटून गेले; मात्र जिल्ह्यात सार्वत्रिक जोरदार पाऊस अद्याप बरसला नसल्याने, पावसाळ्यातही जिल्ह्यातील विविध भागांत पाणीटंचाईच्या समस्येचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. त्यानुषंगाने १ ते ३० या कालावधीसाठी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या पूरक कृती आराखड्यास पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात आली आहे. पूरक कृती आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांपैकी तेल्हारा व अकोट या दोन तालुक्यांतील चार गावांतील पाणीटंचाई निवारणासाठी तीन कूपनलिका व एक विंधन विहीर अशा चार उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकारी कुंभार यांच्या आदेशानुसार प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
मंजूर केलेल्या अशा आहेत
गावनिहाय उपाययोजना !
तालुका गाव उपाययोजना
तेल्हारा भोकर १ कूपनलिका
तेल्हारा भिली १ विंधन विहीर
अकोट पिंप्री खुर्द १ कूपनलिका
अकोट ताजनापूर १ कूपनलिका
३० जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश !
प्रशासकीय मंजुरी दिलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे ३० जूनपर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करून, त्याद्वारे प्रत्यक्ष पाणीपुरवठा करण्यात यावा आणि संबंधित गावांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याकडे लक्ष देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.