लिपिकवर्गीय उर्वरित ५० टक्के भरतीला मान्यता, मग आरोग्य विभागाची कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:18 AM2021-07-26T04:18:23+5:302021-07-26T04:18:23+5:30
शिक्षण मंडळाने कनिष्ठ लिपिक पदासाठी १० सप्टेंबर २०१९ रोजी जाहिरात काढली होती. २ ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीत ...
शिक्षण मंडळाने कनिष्ठ लिपिक पदासाठी १० सप्टेंबर २०१९ रोजी जाहिरात काढली होती. २ ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीत ऑनलाइन परीक्षा झाली. ३ जानेवारी २०२० मध्ये निकाल घोषित झाला; परंतु कोरोना व आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मान्यता देण्यात आली. विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केल्यानंतर २१ जुलै रोजी परिपत्रक काढून ५० टक्के पदभरतीचा निर्णय घेतला. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागात फेब्रुवारी २०१९ मध्ये जाहिरात काढण्यात आली होती. निवडणूक व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत, मात्र त्यानंतर मूळ जाहिरातीच्या ५० टक्के जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी झाली. मूळ जाहिरातमधील ५० टक्के जागांबाबत कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. आता विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या जागा भरल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
आरोग्य विभाग मेरिट विद्यार्थी कृती समितीचा इशारा
आरोग्य विभागातील उर्वरित ५० टक्के जागा भरल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरोग्य विभाग मेरिट विद्यार्थी कृती समितीने दिला आहे. समन्वयक किशोर खेडकर, जगदीश पाटील, वृषाली सुन्नेवार यांनी याबाबत शासनाला निवेदन दिल्याची माहिती अकोल्यातील मेरिट यादीतील उमेदवार आशिष वाघमारे यांनी दिली.
काय आहे उमेदवारांचे म्हणणे
मूळ जाहिरातीमधील जागांनुसार आम्ही गुणवत्ता यादीत आहोत. ५० टक्के पदभरतीच्या नावाखाली आमचा हक्क डावलला जात आहे. शासनाने लवकर नियुक्त्या दिल्या नाहीत तर पुन्हा एकदा स्वप्निल लोणकरसारखी घटना महाराष्ट्रात घडेल. त्यासाठी शासनाने तत्काळ नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.