पीएसी, ब्लिचींग पावडरच्या खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 02:11 PM2018-05-26T14:11:53+5:302018-05-26T14:11:53+5:30
अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या पीएसी पावडरसह ब्लिचींग पावडरच्या खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली.
अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या पीएसी पावडरसह ब्लिचींग पावडरच्या खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. या दोन्ही प्रकारच्या पावडर खरेदीसाठी प्रशासनाने ई-निविदा प्रक्रिया राबवली असता, जादा दराने प्राप्त झालेली निविदा मंजूर करावी लागली.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी सभापती विशाल इंगळे यांनी सभेचे आयोजन केले होते. सभेला सुरुवात होताच
भाजपचे सदस्य अनिल गरड, शिवसेनेच्या मंजुषा शेळके यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. प्रभागातील ज्या भागात टँकरची गरज नाही, त्या परिसरात अवाजवी पाणी पुरवठा केला जात असल्याचा मुद्दा मंजुषा शेळके यांनी मांडला. सभेचे मागील इतिवृत्त मंजूर केल्यानंतर महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पीएसी पावडरच्या पुरवठ्याबाबत प्राप्त निविदेवर चर्चा करण्यात आली. पीएसी पावडरसाठी तीन कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी श्री पार्श्व असोसिएट्स, नागपूर यांची निविदा १४.८४ टक्के जादा दराने मंजूर करण्यात आली. याकरिता मनपाला ३५ लाख ७६ हजार रुपये अदा करावे लागतील, तसेच ब्लिचींग पावडरच्या पुरवठ्याबाबत पार्श्व असोसिएट्सने सादर केलेली १४.५५ टक्के जादा दराची निविदा मंजूर करण्यात आली. यासाठी मनपाला १३ लाख १० हजार रुपये अदा करावे लागतील.
जलकुंभावरून टॅँकरद्वारे पाणी पुरवठा बंद करा!
शहरातील पाणीटंचाईच्या पृष्ठभूमिवर महापालिका प्रशासनाने चार जलकुंभांवरील मुख्य पाइप लाइनवर ‘टॅपिंग’क रून हायड्रंट तयार केले. या हायड्रंटवरून दररोज टॅँकरद्वारे नागरिकांपर्यंत पाणी पोहोचविल्या जात आहे. परिणामी, जलकुंभात पाणी साठवणुकीसाठी अधिक वेळ लागत आहे, तसेच पाण्याला दाब नसल्याने नळाद्वारे विलंबाने पाणी पुरवठा होत आहे. जलकुंभावरील हायड्रंट बंद करून मनपाने झोननिहाय पाण्याचे स्रोत शोधून त्याद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी भाजपचे विनोद मापारी, अनिल गरड, मंजुषा शेळके यांनी लावून धरली. त्याला सभापती विशाल इंगळे यांनी संमती दर्शवली.