जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण आराखड्यास मान्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:21 AM2021-03-09T04:21:17+5:302021-03-09T04:21:17+5:30
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिला. जिल्ह्यातील ४९७ ...
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिला. जिल्ह्यातील ४९७ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी विविध ७१२ उपाययोजनांसाठी कामांसाठी १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपयांचा खर्च कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते जून या कालावधीसाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ८ मार्च रोजी दिला. मान्यता दिलेल्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ४९७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विविध ७१२ उपाययोजनांच्या कामांसाठी १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.
आराखड्यात प्रस्तावित गावे व उपाययोजनांची संख्या
तालुका गावे उपाययोजना
अकोला ९९ १२०
बार्शीटाकळी ५६ १३८
बाळापूर २९ ६१
पातूर ६७ ८८
मूर्तिजापूर ७५ ९०
अकोट ९७ ९७
तेल्हारा ७४ ११८
............................................................................
एकूण ४९७ ७१२
अशा आहेत प्रस्तावित उपाययोजना
पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात विविध ७१२ उपाययोजनांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये ३६ विहिरी खोल करणे व गाळ काढणे, २०० विहिरींचे अधिग्रहण करणे, १० टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, ७० नळयोजनांची विशेष दुरुस्ती, ११ तात्पुरत्या नळयोजना, १८७ नवीन विंधन विहिरी व १४९ नवीन कुपनलिका इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश आहे.