अकोला महापालिका हद्दवाढीतील भागासाठी १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 05:47 PM2018-03-23T17:47:57+5:302018-03-23T17:47:57+5:30
अकोला : महापालिका क्षेत्रात शहरालगतच्या २४ गावांचा समावेश झाल्यानंतर, या भागातील विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
अकोला : महापालिका क्षेत्रात शहरालगतच्या २४ गावांचा समावेश झाल्यानंतर, या भागातील विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मनपा प्रशासनाने सादर केलेल्या ३१० कोटींच्या विकास आराखड्यांपैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला असून, गुरुवारी २० कोटींचा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश नगर विकास विभागाला दिले आहेत.
शहराचे अपुरे भौगोलिक क्षेत्रफळ व शहरालगतच्या गावांचा महापालिकेद्वारे उपलब्ध केल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांवर ताण पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, मनपा क्षेत्राच्या हद्दवाढीसाठी अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा यांनी शासनाकडे रेटा लावून धरला. फेब्रुवारी २०१७ मधील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी शहराची हद्दवाढ झाल्यास मनपाच्या माध्यमातून नवीन प्रभागात सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचा भाजप लोकप्रतिनिधींचा मानस होता. त्यानुषंगाने मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या माध्यमातून आ. सावरकर यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. मुंबईत ठाण मांडून बसलेल्या आ. रणधीर सावरकर यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर सप्टेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी करीत हद्दवाढीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे पुढील चार महिन्यांच्या कालावधीत प्रशासनाने १३ ग्रामपंचायती अंतर्गत येणाºया २४ गावांतील हद्दवाढीचे सोपस्कार पूर्ण केले. मनपाच्या निवडणुकीत २० प्रभागांमधून ८० उमेदवारांपैकी भाजपाचे ४८ उमेदवार विजयी होऊन भाजपाने मनपात एकहाती सत्ता मिळवताच हद्दवाढ झालेल्या भागातील रखडलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी ३१० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला. सभागृहात महापौर विजय अग्रवाल यांनी आराखडा मंजूर केल्यानंतर सात महिन्यांपूर्वी शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यासंदर्भात आ. रणधीर सावरकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देत २० कोटींचा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश नगर विकास विभागाला दिले.