अकोला जिल्ह्यातील पाच गावांसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:33 AM2018-05-06T01:33:00+5:302018-05-06T01:33:00+5:30
अकोला : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाच गावांसाठी पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा ठराव जिल्हा परिषद जल व्यवस्थापन समितीच्या सभेत शनिवारी मंजूर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यातील पाच गावांसाठी पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा ठराव जिल्हा परिषद जल व्यवस्थापन समितीच्या सभेत शनिवारी मंजूर करण्यात आला.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत अकोला तालुक्यातील चिखलगाव व चांदूर आणि मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम, वीरवाडा व पारद इत्यादी पाच गावांसाठी पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याच्या ठरावाला या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची थकीत पाणीपट्टी तातडीने वसूल करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी सभेत दिले. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा आढावा सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, सभापती रेखा अंभोरे, देवका पातोंड, समिती सदस्य श्रीकांत खोने, गोपाल कोल्हे, सरला मेश्राम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सभेला गैरहजर ‘डीसीईओं’ना ‘शो-कॉज’ बजावण्याचे निर्देश!
जिल्हा परिषद जल व्यवस्थापन समितीच्या सभेला पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डीसीईओ) एस. एम. कुळकर्णी अनुपस्थित होते. या मुद्यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्याने ‘डीसीईओ’ कुळकर्णी यांना कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावून कारवाई करण्याचे निर्देश सभेत देण्यात आले.
‘जलयुक्त शिवार’ची कामे पूर्ण करा!
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा या सभेत घेण्यात आला. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी ‘जलयुक्त शिवार’ची कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षांनी संबंधित अधिकाºयांना दिले. तसेच कूपनलिकांच्या कामांचा आढावादेखील सभेत घेण्यात आला.