आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच १०७ कोटींच्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:49 PM2019-03-12T12:49:04+5:302019-03-12T12:49:12+5:30
अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने तब्बल १०७ कोटींच्या विकास कामांचे कार्यादेश जारी केले आहेत.
अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने तब्बल १०७ कोटींच्या विकास कामांचे कार्यादेश जारी केले आहेत. कार्यादेश जारी केलेल्या कामांना कायदेशिरदृष्ट्या कोणताही अडथळा नसल्याने हद्दवाढीच्या भागासह ठिकठिकाणी रस्ते, नाली व इतर कामे प्रगतीपथावर असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे दलितेतर व सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेच्या ४८ कामांपैकी १८ व नागरी दलित वस्तीचे सहा अशा एकूण २४ कामांच्या निविदा अप्राप्त असल्याने सदर कामे लांबणीवर गेली आहेत.
महापालिका क्षेत्रात शासनाने मंजूर केलेल्या ‘अमृत’योजनेंतर्गत भूमिगत गटार योजना व पाणी पुरवठा वितरण प्रणालीची कामे सुरू आहेत. २०१७ मध्ये केंद्र व राज्य शासनाने ‘अमृत’ला मंजुरी दिली होती. त्यावेळी मनपा प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश जारी केले होते. मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने महापालिका क्षेत्राची हद्दवाढ केली. हद्दवाढ केल्यानंतर संबंधित नवीन प्रभागात विकास कामे करण्यासाठी मनपाने ११० कोटींचा विकास आराखडा सादर केला असता, त्यापैकी ९७ कोटींच्या निधीला शासनाने मंजुरी दिली. सप्टेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नवीन प्रभागातील विकास कामे निकाली काढण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्नात होते. मनपा प्रशासनानेसुद्धा तातडीने विकास कामांची यादी तयार करून त्याला राज्य शासनाची मान्यता मिळवली. निविदा प्रक्रिया राबवून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कार्यादेश (वर्क आॅर्डर) जारी केले. यामध्ये ९७ कोटींच्या कामांचा समावेश असून, उर्वरित दहा कोटींमध्ये सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, दलितेतर योजना व नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांचा समावेश आहे.
८ मार्चपर्यंत निविदाच नाहीत!
सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व दलितेतर योजनेच्या ४८ कामांपैकी १८ व नागरी दलित वस्तीचे सहा अशा एकूण २४ कामांसाठी मनपाने निविदा अर्ज बोलावले होते. याकरिता ८ मार्चपर्यंत मुदत होती. या कालावधीत मनपाकडे निविदा अर्ज प्राप्तच झाले नाहीत. आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रशासनाला फेरनिविदा प्रसिद्ध करता येणार नसल्याने ही कामे लांबणीवर गेली आहेत.
आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच प्रशासनाने विकास कामांचे कार्यादेश जारी केले. यामुळे सदर कामे सुरू राहतील. नवीन कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवता येणार नाही.
-संजय कापडणीस आयुक्त, मनपा.