राज्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र घटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:32 PM2019-02-12T12:32:46+5:302019-02-12T12:33:25+5:30
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारी संशोधनावर भर देत शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी करावी, यासाठीची शेती शाळा भरवून शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
अकोला: राज्यात ४० लाख हेक्टरवर असलेले खरीप ज्वारीचे क्षेत्र आता ८ ते ९ लाखांवर आले असून, यामुळे गुरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण तर झालाच, हमखास कमी पावसात येणाऱ्या या पिकामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होत असल्याने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारी संशोधनावर भर देत शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी करावी, यासाठीची शेती शाळा भरवून शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. सोमवारी संपूर्ण कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आतापर्यंत तीनच्यावर खरीप ज्वारीची जात विकसित केली असून, रब्बी हंगामासाठी विशेष पीकेव्ही क्रांती, हुरड्याची पीडीकेव्ही कार्तिकी ज्वारीचे वाणही विकसित केले आहे. हे गोड असून, चव चांगली आहे; पण गेल्या काही वर्षात ज्वारीची पेरणीच घटली आहे. याला पावसाची अनिश्चितता असल्याचे सांगण्यात येत असले तरी ज्वारीला मिळणारे तुटपुंजे दर हे कारण महत्त्वाचे आहे, तसेच पेरणी केल्यानंतर होणारा वन्य प्राण्याचा त्रासही मोठा असल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणीकडे पाठ फिरवली आहे; परंतु यामुळे राज्यात विशेषत: विदर्भात गुरांच्या वैरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पृष्ठभूमीवर अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने ज्वारी पेरणीची चळवळ सुरू केली असून, पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठीच शेतकऱ्यांच्या शेतावर शेती शाळा घेऊन शेतकऱ्यांना ज्वारीची पेरणी, संगोपण, तंत्रज्ञानाचे धडे देण्यात येत आहे. यावर्षी ही सुरुवात अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप या गावातून सोमवार, ११ फेब्रुवारी करण्यात आली आहे. शेतीशाळेला कृषी विद्यापीठच अवतरल्याने शेतकऱ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
- रब्बी ज्वारीचे क्षेत्र राज्यात २८ लाख हेक्टरवर असले तरी पावसावर अवलंबून असलेल्या खरीप ज्वारीचे क्षेत्र ४० लाखाहून ८ लाखावर आले आले. म्हणूनच ज्वारी संशोधन करू न शेतकºयांना ज्वारी पेरणीसाठी शेतावर जाऊन प्रोत्साहन देण्यात येत आहे.
डॉ. आर.बी. घोराडे,
ज्वार संशोधक,
डॉ. पंदेकृवि, अकोला.