अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात युक्तिवाद पूर्ण; पुढील सुनावणी गुरुवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:18 PM2019-08-04T12:18:40+5:302019-08-04T12:18:45+5:30
शनिवारी जिल्हा सरकारी विधिज्ञांनी आपली बाजू मांडली असून, आता प्रकरणाचा निकाल अंतिम टप्प्यात आहे.
अकोला: टिळक रोडवरील त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्समध्ये २०१७ मध्ये एका कचरा वेचणाऱ्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणात चार दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आयरलँड यांच्या न्यायालयात शनिवारी जिल्हा सरकारी विधिज्ञांनी आपली बाजू मांडली असून, आता प्रकरणाचा निकाल अंतिम टप्प्यात आहे. ८ आॅगस्ट रोजी पुन्हा या प्रकरणात न्यायालयात सुनावणी होणार आहे.
त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्सच्या वरच्या मजल्यावर १५ एप्रिल २0१७ रोजी आरोपी गोविंद परसराम साखरे, शेख मुस्तकीम, मोहसीन कुरेशी या तिघा नराधमांनी मुलीला आमिष दाखवून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. तेव्हापासून आरोपी कारागृहात आहेत. या प्रकरणात १ आॅगस्टपासून प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आयरलँड यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी विधिज्ञ गिरीश देशपांडे यांच्यासह आरोपींच्या विधिज्ञांनी जोरदार युक्तिवाद करून आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, आता या प्रकरणात पुढील सुनावणी ८ व ९ आॅगस्ट रोजी होणार आहे. (प्रतिनिधी)