भीमनगरमध्ये दोन गटात सशस्त्र हाणामारी
By admin | Published: September 5, 2016 02:50 AM2016-09-05T02:50:09+5:302016-09-05T02:50:09+5:30
कुख्यात गुंडांसह अनेकांवर गुन्हे दाखल; डाबकी रोड पोलिसांसह अतिरिक्त पोलीस दल तैनात.
अकोला, दि. ४ : डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दतील भीमनगरमध्ये शनिवारी रात्री उशिरा क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी कुख्यात गुंडांसह अनेक आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. या हाणामारीतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, घटनास्थळावर डाबकी रोड पोलिसांसह अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.
भीमनगर येथील रहिवासी उषा इंगळे यांच्या नातवासोबत याच परिसरातील मुलांची कॅरमची एक गोटी देवाण-घेवाणीवरून आठ दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. हा वाद आपसात मिटविण्यातही आला. मात्र, अंतर्गत धुसफूस सुरूच असल्याने या वादाने शनिवारी मध्यरात्री रौद्ररूप धारण केले. भीमनगरमधील कुख्यात गुंडांसह दोन गट आमने-सामने आले. त्यांच्यात सशस्त्र हाणामारी झाली. यामध्ये सहा ते सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, यांच्यासह पोलीस अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांसह अतिरिक्त कुमक या ठिकाणी दाखल झाल्यानंतर भीमनगर चौकातील परिस्थिती निवळली. या प्रकरणी उषा इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, सुमित अशोक सिरसाट, मॅडी ऊर्फ रुषील धरम सिरसाट, आकाश देवराव सिरसाट, सागर खाडे, विजू (पेंटर) क्षीरसागर, पुनीत सुखराम क्षीरसागर, सागर अशोक सिरसाट, बंटी धरम सिरसाट, जितू सिरसाट, बंटी मोहोड, साहेबराव सिरसाट सर्व राहणार भीमनगर चौक यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले, तर छाया अशोक सिरसाट (४0) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एकनाथ इंगळे, लल्ल्या इंगळे, भद्या ऊर्फ संतोष वानखडे, सोनू इंगळे, राहुल इंगळे, विशाल इंगळे, संदीप इंगळे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या मधील काही आरोपींना डाबकी रोड पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
कडक बंदोबस्त
भीमनगरातील परिस्थिती नियंत्रणात असून, पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे. या परिसरात तणावसदृश परिस्थिती असल्याने जिल्हा पोलिसांसह कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.