कोरोना लसीकरण पथक असल्याचा बनाव करीत अकोटात भरदिवसा सशस्त्र दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:41 AM2021-09-02T04:41:28+5:302021-09-02T04:41:28+5:30
अकोट : कोरोना लसीकरणाचे पथक असल्याचा बनाव करीत शहरातील रहदारी असलेल्या जवाहररोडलगत बुधवार वेस परिसरात भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकल्याची ...
अकोट : कोरोना लसीकरणाचे पथक असल्याचा बनाव करीत शहरातील रहदारी असलेल्या जवाहररोडलगत बुधवार वेस परिसरात भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना मंगळवारी (दि. ३१) घडली. या घटनेत तिघांना मारहाण करून एका खाेलीत बांधून ठेवले होते.
शहरातील प्रसिद्ध व्यापारी अमृतलाल सेजपाल हे कुटुंबासह वरच्या माळ्यावर राहतात. त्यांच्या घरी दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास काही महिला व पुरुष आले. त्यांनी कोरोना लसीकरण चौकशी पथक असल्याचा बनाव केला. यावेळी सेजपाल यांची नात देलिशा हिने मी विद्यार्थी असल्याने लस घेतली नसल्याचे सांगितले. त्यामुळे या बनावट पथकाने घरात कोण कोण आहे, याबाबत विचारणा केली. देलिशाला शंका येताच तिने बनावट पथकातील एकास ओळखपत्र मागितले. त्यानंतर दरोडेखोर टोळीतील एका महिलेने घरात प्रवेश करीत वयोवृद्ध अमृतलाल सेजपाल, त्यांची पत्नी इंदूबहन सेजपाल, नात देलिशा यांना मारहाण करून तोडांमध्ये बोळे कोंबले, तसेच दोरीने बांधून एका खोलीत कोंडून ठेवले. अमृतलाल सेजपाल यांना मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील साहित्याची फेकाफेक करीत कपाट फोडले. त्यानंतर सेजपाल यांनी आरडाओरडा केली असता शेजाऱ्यांनी धाव घेतली, तोपर्यंत दरोडेखोर बाहेरून दरवाजा बंद करून पळून गेले होते. शेजारच्यांनी तिघांची सुटका केली. अमृतलाल सेजपाल जखमी असल्याने त्यांच्यावर डॉ. विशाल इंगोले यांनी उपचार केले. अमृतलाल सेजपाल यांचा मुलगा यश्वीन, सून भावना व लहान नातू शौर्य हे बाहेरगावी (खामगाव) गेले होते. दरोडेखोरांनी एक मोबाइल लंपास केला आहे. घरातील किती रुपयांचा ऐवज लंपास केला याबाबतची चौकशी सुरू आहे.
-----------------------------
जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट
माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर डीबी स्काॅडसह पोलीस कर्मचारी विविध दिशेने पाठवले. घटनास्थळी आलेल्या डाॅग स्काॅडने दरोडेखोरांचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. या प्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, एलसीबी प्रमुख संतोष महल्ले यांनी भेट दिली.
----------------
घरोघरी रेकी करताहेत महिला?
गत काही दिवसांपासून दोन महिला शहरातील काही भागात घरोघरी फिरून कोरोनासंबंधी माहिती घेत असल्याचे भासवत आहेत. घरी कोण कोण असते, वय किती, किती वाजता सर्व घरी असतात, आधार कार्ड आदींबाबत माहिती घेत रेकी करीत आहेत. अशाच प्रकारची रेकी काही दिवसांपूर्वी अंबिकानगर परिसरात केल्याचे समजते. त्यामुळे या परिसरातील सीसी कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये संशयित अज्ञात आरोपी आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---
पोलिसांचे चार पथक तपासकामी सक्रिय केले. येणे-जाणे मार्गावरील सीसी फुटेज तपासण्यात येत आहे. यानंतर लसीकरण माहितीसाठी कोणीही आल्यास दरवाजा उघडण्यापूर्वी वैद्यकीय पथक असल्याची खात्री करावी. गतीने तपास करण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
-जी श्रीधर, जिल्हा पोलीस अधीक्षक
--------
कोरोना लसीकरण संबंधित घरोघरी जाऊन चौकशी व तपासणीसाठी शासनाचे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय पथक कार्यान्वित नाही. त्यामुळे लोकांनी सतर्क राहावे, काळजी द्यावी.
- डॉ. मंगेश दातीर, वैद्यकीय अधीक्षक, अकोट